राजाचे कुर्लेत आढळला ऐतिहासिक शिलालेख : सुवर्णकाळ उलगडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:01 AM2018-09-05T00:01:56+5:302018-09-05T00:03:24+5:30
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक प्राचीन वास्तू साताऱ्याचा इतिहास उलगडत आहेत. नुकताच राजाचे कुर्ले या ठिकाणी एक प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी घराण्यातील असून, तो सुमारे साडेआठशे वर्षे जुना
सातारा : सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक प्राचीन वास्तू साताऱ्याचा इतिहास उलगडत आहेत. नुकताच राजाचे कुर्ले या ठिकाणी एक प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी घराण्यातील असून, तो सुमारे साडेआठशे वर्षे जुना असावा, असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले आहे. या प्राचीन शिलालेखातून साताºयाचा सुवर्णकाळ उलगडण्यास मदत मिळणार आहे.
जिज्ञासा इतिहास संशोधन गेल्या दोन दशकांपासून साताºयाच्या इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परिसरातील अनेक ऐतिहासिक वस्तू, वास्तू, शिलालेख प्रकाशात आणून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. साधारण एक वर्षापूर्वी साताºयाच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने केलेल्या सर्वेक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख आढळून आला आहे.
कºहाडपासून २६ किलोमीटर अंतरावर गिरिजा शंकराच्या पायथ्याला राजाचे कुर्ले हे गाव वसलं आहे. या गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे. ग्रामदैवत असणारे धाकूबाईचं मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर अशी इतर मंदिरे आहेत. धाकूबाई मंदिराचे बांधकाम फारसे प्राचीन नाही; परंतु मंदिराजवळच प्राचीन जीर्ण स्थितीतील गजलक्ष्मी शिल्प अन् काही वीरगळी आणि भग्न शिल्पे या परिसराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.
याच मंदिर आवारात सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख भिंतीत बसवलेला आहे. शिलालेख खूपच जीर्ण झालेला असून, कालौघात त्याच्यावर सिमेंट-वाळूचा थर बसल्याने शिलालेखाचा बराचसा भाग अनाकलनीय झाला आहे. जिज्ञासाच्या सदस्यांनी गेल्या काळात वेळोवेळी भेट देऊन शिलालेख स्वच्छ केला आहे. वेगवेगळी तंत्रे वापरून त्याचे ठसे घेतले. त्याचबरोबर आधुनिक फोटोग्राफी तंत्राचा वापरही केला. शिलालेखाची लिपी देवनागरी आहे. तसेच अक्षरे खूपच खराब झाल्याने शिलालेखाचे वाचन करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत.
या शिलालेखाच्या संशोधनकामी राजाचे कुर्ले गावाचे इतिहासप्रेमी नागरिक सुहास राजेभोसले तसेच प्रशांत गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. जिज्ञासाचे धैर्यशील पवार, विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, नीलेश पंडित, सागरनाथ गायकवाड, शीतल दीक्षित यावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच त्याची माहिती लोकांसमोर ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.
काय आहे शिलालेख?
या शिलालेखाची सुरुवात शके १०८५ सुभानु नाम संवत्सर याने झाली आहे. या शिलालेखावर ‘सुवर्ण वृषभ ध्वज, समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त, विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरविलेला जे सिंघदेव याने हे भूमिदान दिलेलं आहे. हे दान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिलेले आहे, असा उल्लेख आढळतो.