ऐतिहासिक मंगळवार तळ्याला झुडपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:07+5:302021-07-10T04:27:07+5:30

सातारा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सातारा शहराला इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आपले ...

The historic Tuesday pond is surrounded by bushes | ऐतिहासिक मंगळवार तळ्याला झुडपांचा वेढा

ऐतिहासिक मंगळवार तळ्याला झुडपांचा वेढा

Next

सातारा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सातारा शहराला इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून असलेले हौद व तळ्यांचे अस्तित्व मात्र धोक्यात येऊ लागले. आहे. शहरातील मंगळवार तळ्याला झाडाझुडपांनी वेढा दिला असून, येथील स्वच्छतेकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.

सातारा शहराची भौगोलिक रचना पाहता शहराच्या जवळपास नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे हे शहर वसविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शहरात सर्वप्रथम पाणी खेळवले. शहरात प्रथम पाणी आले ते यवतेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तळ्यातून. शहरात पाणी आल्यानंतर प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी पाणी वितरण व्यवस्था समृद्ध केली. शहरात तळी व हौद बांधले. कालांतराने नवीन राजवाड्याचे बांधकाम करण्यासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. या खड्ड्याच्या ठिकाणी औंधच्या पंतप्रतिनिधींकडून आखीव-रेखीव तळे बांधण्यात आले. पुढे पेठेच्या नावावरून या तळ्याला मंगळवार तळे हे नाव रूढ झाले. पूर्वी हे तळे ‘पंतांचे तळे’ अथवा ‘श्रीपतरावांचे तळे’ म्हणूनही ओळखले जायचे. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तळ्याचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे.

तळ्याच्या चारही बाजूंच्या भिंतींवर झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले असून, या झुडपांची मुळे संरक्षक भिंती कमकुवत करू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका वाहनाच्या धडकेत तळ्याचा भिंतीचा काही भाग देखील ढासळला आहे. बंदी असताना देखील या तळ्यात अनेक नागरिक निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावातील पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून, याचा फटका तळ्यातील जलचरांवर होत आहे. पाण्यातील आॅक्सिजनची पातळी कमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी तळ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. नानाविध कारणांनी या तळ्याचे अस्तित्व धोक्यात आले असताना पालिका प्रशासनाकडून त्याच्या संवर्धनासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे इतिहास प्रेमींमधूनही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

(चौकट)

तळे करण्यात आले होते गाळमुक्त

सातारा पालिकेकडून काही वर्षांपूर्वी मंगळवार तळे गाळमुक्त करण्यात आले होते. याशिवाय या तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाकडून ऐतिहासिक वस्तूंची म्हणावी तशी निगा राखली जात नाही. मंगळवार तळ्याबरोबरच शहरातील इतर तळी व हौदांची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे.

(कोट)

तळ्याची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु पालिका प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही. नागरिक येता-जाता तळ्यात निर्माल्य टाकतात. काही जण घरातील कचरादेखील टाकतात. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. तळ्याची स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

- श्रीरंग काटेकर, सातारा

फोटो : ०९ मंगळवार तळे

सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्याला अशा प्रकारे झाडाझुडपांनी वेढा दिला आहे.

Web Title: The historic Tuesday pond is surrounded by bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.