ऐतिहासिक वडूज क्रांती मोर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:48+5:302021-09-09T04:46:48+5:30
सातारा : १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती ...
सातारा : १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जागविल्या जात आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी वडूज येथे हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्य सैनिक सत्कार समारंभ संपन्न होत आहे. त्या निमित्ताने...
९ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला आणि देशातील जनतेला आंदोलनाची हाक दिली. काँग्रेस पक्षाचे देशभरातील सर्व कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाची वाटच पाहत होते. मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाने कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. आतापर्यंत सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू असलेले स्वातंत्र्य आंदोलन. देशातील सर्वांत मोठे स्वातंत्र्य आंदोलन म्हणून इतिहासात नोंद झालेले सातारचे ‘प्रती सरकार’ आंदोलन हा त्याचाच एक भाग आहे.
काँग्रेस पक्षाने ९ ऑगस्ट रोजी मुंबईत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खटाव (जि. सातारा) तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. तालुक्याच्या काेनाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते वडूजच्या बाजार पटांगणावर जमा झाले होते. महात्मा गांधींसह काँग्रेसच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांना अटक केल्यामुळे जमाव प्रक्षुब्ध झाला होता. ब्रिटिशांविरोधी घोषणा देत सरकारचा निषेध केला जात होता. खटाव तालुक्यातील काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष परशुराम घार्गे यांनी वडूज कचेरीवर चाल करून जाण्याचे आवाहन उपस्थित जमावाला केले. स्वत: तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन परशुराम घार्गे पुढे निघाले. त्यांच्या मागे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
अत्यंत क्रूर स्वभावाच्या फौजदार बंडीगिरीने या मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. बंडीगिरी याने अत्यंत निर्दयीपणे थेट परशुराम घार्गे यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या मागोमाग धावलेल्या हुतात्मा बलभीम हरी खटावकर (पुसेसावळी), हुतात्मा बाळकृष्ण दिगंबर खटावकर (पुसेसावळी), हुतात्मा आनंदा श्रीपती गायकवाड (ज. वडगाव), हुतात्मा सिंधू भिवा पवार (ज. वडगाव), हुतात्मा किसन बाळा भोसले (ज. वडगाव), हुतात्मा खाशाबा मारुती शिंदे (ज. वडगाव), हुतात्मा श्रीरंग भाऊ शिंदे (उंचीठाणे), हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार (ज. वडगाव) या आणखी आठ कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. महात्मा गांधींच्या विचारांनी व ध्येयवादाने प्रेरित झालेले नऊ कार्यकर्ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झाले.
वडूज कचेरीवरील मोर्चात बलिदान दिलेल्या नऊ स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती कायमस्वरूपी नजरेसमोर राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने वडूज येथे ‘हुतात्मा स्मारक’ उभारले आहे. याठिकाणी प्रतिवर्षी ९ सप्टेंबरला शासकीय इतमामात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. वडूजच्या मोर्चाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, प्रदेश काँग्रेसचे सचिव रणजित देशमुख स्वागताध्यक्ष आहेत. स्वातंत्र्य चळवळीचा देदीप्यमान इतिहास आणि वडूज मोर्चाचे स्मरण करणे, स्मृती जागविणे हे प्रेरणादायी कार्य आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
- राजेंद्र शेलार, सचिव
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी