ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:03 PM2017-10-01T23:03:21+5:302017-10-01T23:03:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. हा ऐतिहासिक ओळखला जाणारा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती.
यावेळी सार्वजनिक मंडळांच्या देवींची मिरवणूकही निघाली. त्यानंतर अनेक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात झालेल्या भवानी तलवार पूजन सोहळ्याला राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे, चिरंजीव वीरप्रतापसिंहराजे आदी राजघराण्यातील मंडळी उपस्थित होती.
पूजन केल्यावर ही भवानी तलवार फुलांनी सजविलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथे आणण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताºयांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे शास्त्रशुद्ध पूजन उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंहराजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती शास्त्रींनी पौरोहित्य केले. सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रीम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेने शाही मिरवणूक
जलमंदिरपासून निघालेल्या शाही मिरवणुकीत हजारो सातारकर सहभागी झाले होते. त्यातील अनेकांनी पारंपरिक वेशभुषा परिधान केली होती. त्यामुळे या मिरवणुकीला एक वेगळी ऐतिहासिक किनार लाभली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.