ऐतिहासिक प्रतापगड ३५७ मशालींनी उजळला--परंपरा दीपोत्सवाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:28 PM2017-09-23T23:28:30+5:302017-09-23T23:31:35+5:30
महाबळेश्वर : इतिहासाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला शनिवारी (दि. २३) रात्री ३५७ मशालींनी उजळून निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : इतिहासाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला शनिवारी (दि. २३) रात्री ३५७ मशालींनी उजळून निघाला. गडावरील भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थी दिवशी ३५७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे सातवे वर्ष आहे. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.
प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाºया शाळीग्राम दगडापासून भवानीमातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविण्यात आल्या. तेव्हापासून नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली.
यंदा भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्याने किल्ल्यावर भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री आठ वाजता भवानीमातेच्या मंदिरापासून ते बुरुजापर्यंत ३५७ मशाली पेटविण्यात आल्या. दीपोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह नागरिकांनी प्रतापगडावर गर्दी केली होती. हस्तकला केंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर, किल्लेदार विजय हवलदार, संतोष जाधव, माय भवानी सामाजिक संस्था प्रतापगड, वाडा कुंभरोशी ग्रामस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
घटस्थापनेचे वैशिष्ट्य
प्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात दोन घट बसविले जातात. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने. कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबतू केला. त्यांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.
ऐतिहासिक प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी रात्री गडावर ३५७ मशाली पेटवून मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा अनोखा अन् पारंपारिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.