शौर्यदिनी साताऱ्यात ऐतिहासिक मानवंदना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:56 AM2021-01-02T04:56:00+5:302021-01-02T04:56:00+5:30

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन ...

Historical salute in Satara on Shauryadini! | शौर्यदिनी साताऱ्यात ऐतिहासिक मानवंदना!

शौर्यदिनी साताऱ्यात ऐतिहासिक मानवंदना!

Next

सातारा : एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा-कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला मनोभावे अभिवादन करतात. या अभिवादन सोहळ्यात समता सैनिक दलाच्या मानवंदनेला विशेष महत्त्व असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाच्यावतीने सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सैनिकी इतमामात मानवंंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शोर्यदिनाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.

१ जानेवारी १८१८ चा रणसंग्राम जगभर चर्चेत राहिला आहे. या रणसंग्रामाचे स्मरण करून शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात मानवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्याहस्ते पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मेजर जयसिंगराव सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, सुभेदार मोहन यादव, सुभेदार विश्वनाथ गायकवाड, कमांडर उत्तम कांबळे, कमांडर संयोजना बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सैनिक दलाच्या इतमामात पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, वंचितचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, बसपचे जिल्हाप्रमुख दादासाहेब गायकवाड, अमर गायकवाड, समाजवादी रिपब्लिकनचे पी. डी. साबळे, रिपब्लिकन गवई गटाचे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अशोक गायकवाड यांनी यावेळी आपली भूमिका व्यक्त करताना स्पष्ट केले की, भीमा-कोरेगावचा इतिहास जाज्ज्वल्य आहे. तो अन्यायाविरुध्दचा प्रखर आक्रोश आहे. जेव्हा जेव्हा इथल्या व्यवस्थेने सर्वसामान्य, गोरगरीब माणसावर अन्याय केला, छत्रपती शिवरायांना विरोध केला, तेव्हा तेव्हा मागास समाज हा पेटून उठला आहे. यापुढील काळात छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील लोकशाही अंमलात आणावयाची असेल, तर आपण जागृत रहायला हवे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.

अरुणभाऊ पोळ यांनी प्रास्ताविकात शोर्यदिनाचा इतिहास सांगितला. चंद्रकांत खंडाईत यांनी संविधानाला अनुसरुन यापुढील लढाई कशी लढता येईल, यासाठीचा प्रयत्न करायला हवा, असे स्पष्ट केले. अमर गायकवाड आदींची यावेळी मनोगते झाली.

प्रारंभी त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतानंतर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर वैभव गायकवाड, शाहीर भोसले यांनी क्रांतिगीते सादर केली, तर समता सैनिक दलाच्या शौर्यगीताने मानवंदनेचा शेवट झाला. सूत्रसंचालन व आभारपर भूमिका साहित्यिक अरुण जावळे यांनी मांडली.

फोटो ओळ : सातारा येथे भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी सैनिकी इतमामात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

फोटो नेम : ०१जावेद

Web Title: Historical salute in Satara on Shauryadini!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.