लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात विसावणार!, इतिहासप्रेमींमध्ये उत्कंठा 

By सचिन काकडे | Published: June 17, 2024 12:33 PM2024-06-17T12:33:48+5:302024-06-17T12:34:21+5:30

जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आगमन

Historical waghnakh in London will rest in Satara museum, excitement among history lovers | लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात विसावणार!, इतिहासप्रेमींमध्ये उत्कंठा 

लंडनमधील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्याच्या संग्रहालयात विसावणार!, इतिहासप्रेमींमध्ये उत्कंठा 

सचिन काकडे

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाघनखांसाठी संग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनाचे काम अंतिम टप्प्यात असून, सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यात येतील, अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. वाघनखे भारतात आल्यानंतर ती सातारा, कोल्हापूर व नागपूर येथील संग्रहालयात एक-एक वर्षासाठी ठेवली जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इतिहासप्रेमी या वाघनखांची आतुरतेने वाट पाहत होते; परंतु सुरक्षेसह अन्य कारणांमुळे वाघनखांचा प्रवास लांबणीवर पडला. 

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून वाघनखे ठेवण्यासाठी काही निकष व अटी घालण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाकडून सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्याने वाघनखे भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वतंत्र दालन बनविण्यात आले आहे. या ठिकाणी ही वाघनखे दहा महिने ठेवली जाणार असून, इतिहासप्रेमी सातारकरांना ती प्रत्यक्षात पाहता येणार आहेत.

अशी आहे दालनाची व्यवस्था..

  • वस्तुसंग्रहालयात वाघनखांसाठी स्वतंत्र दालन
  • वाघनखे ठेवण्यासाठी विशिष्ट पेटी दिल्ली येथे तयार करण्यात आली
  • पेटीचा खालचा भाग पोलादी व वरील भाग काचेचा पारदर्शक आहे
  • ही काच लॅमिनेटेड व अत्यंत भक्कम अशी आहे
  • या दालनाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे व बंदूकधारी सुरक्षारक्षक
  • सुरक्षेसाठी वाघनखांच्या पेटीभोवती सेन्सर
  • प्रतापगडावरील शिवपराक्रमाचे दालनातील भिंतीवर रेखाचित्र


वाघनखे लंडनवरून मुंबई व तेथून थेट साताऱ्यात आणली जातील. पुरातत्त्व विभागाकडून या वाघनखांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघनखे साताऱ्यात येतील. तिथून पुढे दहा महिने ही वाघनखे नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जातील. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक

Read in English

Web Title: Historical waghnakh in London will rest in Satara museum, excitement among history lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.