भादे ग्रामपंचायतीत ग्रामविकास परिवर्तनने रचला इतिहास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:31+5:302021-01-21T04:35:31+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या व तिरंगी लढत झालेल्या भादे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ पैकी ८ जागा जिंकून ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या व तिरंगी लढत झालेल्या भादे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ पैकी ८ जागा जिंकून ग्रामविकास परिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलचा दारुण पराभव केला. भादे ग्रामपंचायतीमध्ये ५० वर्षांनंतर सत्तांतर घडवून ग्रामविकास परिवर्तनने इतिहास घडवला.
ग्रामस्थांनी युवा नेतृत्व संभाजी साळुंखे यांना ताकद देऊन नव्या विकास पर्वाचा नारा दिला.
भादे ग्रामपंचायतीवर जिल्हा बँकेचे माजी संचालक हणमंतराव साळुंखे व जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे यांचे अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक संभाजी साळुंखे यांनी गावातील नाराजांची एकत्रित मोट बांधली. सर्वसमावेशक नेतृत्व आणि युवा फळीचे चांगले संघटन करून ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांची सांगड घालून स्वतंत्र पॅनल उभारून तिसरा पर्याय दिला. त्याला लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी साथ दिली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनल, संभाजी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास परिवर्तन पॅनल व भैरवनाथ परिवर्तन पॅनलमध्ये अतिशय चुरशीची तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते.
या लढतीमध्ये ग्रामविकास परिवर्तनचे विशाल गायकवाड, नीलांबरी बुनगे, मालन चव्हाण, आनंद गायकवाड, आशा गायकवाड, संजय ठोंबरे, संतोष साळुंखे, चित्रा खुंटे हे आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत, तर चंद्रकांत साळुंखे, ज्योती साळुंखे व वैशाली साळुंखे यांना अल्पमताने पराभव स्वीकारावा लागला. तसेच सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्ताधारी गटाचा दारुण पराभव झाल्याने राष्ट्रवादी गटावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळालेल्या या गटाला जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे गावातील प्रलंबित विकासेकामे मार्गी लावण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
(चौकट)
विकासकामांसाठी आम्ही कटिबद्ध : संभाजी साळुंखे
भादे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये युवकांनी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट केले. गावातील जनतेने देखील पॅनलच्या सर्व प्रमुखांवर विश्वास ठेवून जनमताचा कौल देत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. जनतेच्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जाऊ देणार नाही. वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे युवा नेते संभाजी साळुंखे यांनी स्पष्ट केले.
२०भादे
फोटो ओळ : भादे ग्रामपंचायत निवडणुकीमधील ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.