इतिहास जागविणारा ‘अजिंक्यतारा’ भेगाळला!
By Admin | Published: April 17, 2017 11:19 PM2017-04-17T23:19:31+5:302017-04-17T23:19:31+5:30
बुरूज ढासळला : भिंतींनाही तडे, अस्तित्वावर नैसर्गिक संकट
सचिन काकडे ल्ल सातारा
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला आज डामडौलात उभा असला तरी भविष्यात या किल्ल्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे असलेला जुना बुरूज ढासळला असून, किल्ल्याच्या अनेक दगडी भिंतींना तडे गेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून तग धरून असलेल्या या भिंती ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत भेगाळत चालल्या असून, याची दुरुस्ती न झाल्यास या ढासळण्याची
भीती दुर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
अजिंक्यतारा किल्ला आजही पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. ऐतिहासिक महत्त्व लाभल्याने पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल असते. किल्ल्यावर असलेली मंदिरे, पाण्याची तळी, नैसर्गिक वनसंपदा, जुन्या वाड्याचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात. या सर्व गोष्टी इतिहास जागवित असल्या तरी किल्ल्याच्या सुरक्षेकडे पुरातत्व विभागासह सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडे असलेला बुरूज पूर्णपणे ढासळला आहे. परिणामी मुख्य तटबंदीला याचा धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या व्यतिरिक्त प्रवेशद्वारावरील दगडी भिंतीलाही तडे गेले आहेत.
तटबंदीवर वाढतायत वृक्ष
किल्ल्याची तटबंदी अभेद्य असली तरी या तटबंदीला वृक्षांमुळे इजा पोहोचत आहे. वृक्षांची मुळे तटबंदीला पोकळ असल्याने दगडांमधील भेगा रुंदावत चालल्या आहेत. किल्ल्यावर ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.
दिवसेंदिवस रुंदावतायत भेगा
अजिंक्यतारा किल्ल्यावरील तटबंदीसह अनेक ठिकाणच्या भिंती भेगाळल्या आहेत. पाऊस-पाण्यामुळे या भिंतींमधील चुनखडी तसेच तत्सम पदार्थांचे वहन झाले असून, भिंतींमधील अंतर रुंदावत चालले आहे. काही भिंतींना भेगा पडल्याने दगडांची रचनाही बदलली आहे.
प्रवेशद्वारालाही अवकळा
किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वारालाही सध्या अवकळा लागली आहे. प्रवेशद्वाराचा पुरातन व लाकडी दरवाजा मजबूत स्थितीत असला तरी खालच्या बाजूने मात्र, तो कुजत चालला आहे. दरवाजाचा काही भाग तुटला असून, लोखंडी कडीतून निखळलाही आहे.