संचारबंदीसह नियमभंग करणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:55+5:302021-04-21T04:38:55+5:30
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यासह वाहतूक शाखेने ठिकठिकाणी बॅरिगेटस् उभारले आहेत. शहरातील मुख्य रस्ते बॅरिगेट्सने अडविण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल या मुख्य मार्गांसह बाजारपेठेतील रस्त्यांवर पोलीस तैनात आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहने अडवून घराबाहेर पडण्याचे कारण पोलिसांकडून विचारले जात आहे. कारण वैध असेल तर संबंधिताला सोडले जाते. मात्र, घराबाहेर पडण्यासाठीचे कारण अत्यावश्यक नसेल तर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दुचाकीही जप्त करण्यात येत आहेत. या जप्त केलेल्या दुचाकी संचारबंदी हटविल्यानंतर संबंधितांना परत केल्या जाणार आहेत.
संचारबंदीसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी वॉच ठेवला आहे. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करीत आहेत. कऱ्हाड शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाकडून संचारबंदीतील ही कारवाई करण्यात येत असून, गत पाच दिवसांत पोलिसांनी अडीच लाखांचा दंड वसूल केला आहे.
- चौकट
१५ एप्रिलपासून कारवाई
जप्त दुचाकी : १०२ : ०
मास्क : २१० : ४२,५०० रु.
सोशल डिस्टन्स : ७ : ७००० रु.
मोटर वाहन कायदा : १००० : २,००,००० रु.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. (छाया : अरमान मुल्ला)