साताऱ्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:05 PM2020-06-11T12:05:21+5:302020-06-11T12:07:28+5:30
सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरलेला माल विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली.
सातारा : शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरलेला माल विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडी व चोरीतील एक एलसीडी व दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रवी निलकंठ घाडगे (वय २५), सागर नागराज गोसावी (वय २२, दोघे रा. सैदापूर), भिवा उर्फ आकाश दत्तात्रय दणाणे (वय १९, रा. तामजाईनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मंगळवारी दुपारी शहरात गस्त घालत होते. दरम्यान, मोळाचा ओढा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना काही तरूण परिसरातून संशयास्पद फिरत असल्याचे दिसले.
साबळे यांनी संबंधितांना थांबवून विचारपूस केली मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. मोळाचा ओढा, तामजाईनगर, मनिषा कॉलनी, आंबेदरे रोड परिसरात घरफोडी केल्याचे चौकशीदरम्यान कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेला एक एलसीडी व दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या. संशयितांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, जोतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, नितीन भोसले, गणेश कापरे, वैभव सावंत, धीरज महाडिक, केतन शिंदे, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.