कोरोनाग्रस्तांसह कुटूंबियांना घरपोच जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:23+5:302021-05-14T04:39:23+5:30

उंब्रज : सामूहिक संकटे येतात आणि जातात. या संकटकाळात मदत करण्यासाठी समाजातील काही घटक तेवढ्याच ताकदीने समोर येतात. माणुसकी ...

Home-cooked meals for families with coronaries | कोरोनाग्रस्तांसह कुटूंबियांना घरपोच जेवण

कोरोनाग्रस्तांसह कुटूंबियांना घरपोच जेवण

Next

उंब्रज : सामूहिक संकटे येतात आणि जातात. या संकटकाळात मदत करण्यासाठी समाजातील काही घटक तेवढ्याच ताकदीने समोर येतात. माणुसकी जपतात. त्यापैकी एक म्हणजे येथील शिवभक्त प्रतिष्ठान. लोकांच्या मदतीतून पूरग्रस्तांना लाखो रुपयांची मदत करणारे हे शिवभक्त कोरोना काळातही मागे राहिलेले नाहीत. त्यांनी उंब्रज व परिसरातील गरजू कोरोनाग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांना स्वखर्चाने जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना उंब्रजमधील नागरिक, व्यावसायिक व शिवभक्त प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जमा केलेल्या निधीतून लाखो रुपयांचे अन्नधान्य, कपडे व औषधे यांचे वाटप केले होते. लाॅकडाऊन झाल्यानंतर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, होमगार्ड रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत, तर ग्रामपंचायत सफाई, कर्मचारी, कचरा साफ करून स्वच्छता करत आहेत. या सर्वांना गरम नाष्टा देण्याचा उपक्रमही शिवभक्ततर्फे राबविण्यात आला.

कोरोनाचा फैलाव सर्वत्र होत आहे. पूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोरोना बाधित होऊ लागली आहेत. आजाराच्या तीव्रतेवर कुटुंबातील काही सदस्य दवाखान्यात, तर काही घरी उपचार घेऊ लागलेत. यामुळे हे सर्व करताना कुटुंबातील प्रमुखांची तारांबळ उडत आहे. अशा कुटुंबातील सदस्यांना मोफत घरपोच जेवण देण्याचा उपक्रम शिवभक्त प्रतिष्ठानच्यावतीने सुरू केला आहे. यामुळे उंब्रज व परिसरातील गरीब व गरजू कोरोनाग्रस्त कुटुंबांना मदत मिळत आहेच. त्याचबरोबर त्यांचे मनोबलही वाढत आहे.

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे पूर्ण कुटुंब बाधित होऊ लागले आहेत. यातील घरात राहून उपचार घेणाऱ्या गरीब व गरजू लोकांना जेवण मिळणेही अवघड बनले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा घटना समजू लागल्या. त्यामुळे शिवभक्त प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी मिळून या कुटुंबांना मोफत जेवण घरपोच देण्याचा निर्णय घेतला. अशा पध्दतीने उंब्रज व परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना घरपोच सकस जेवण पोहोच करत आहोत.

- विजय जाधव, अध्यक्ष, शिवभक्त प्रतिष्ठान, उंब्रज.

Web Title: Home-cooked meals for families with coronaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.