‘होम मिनिस्टर’ प्रचारात!
By admin | Published: October 7, 2014 10:44 PM2014-10-07T22:44:10+5:302014-10-07T22:44:10+5:30
दक्षिणेच्या लढाईत रणरागिणी : पृथ्वीराजांसह अनेकांच्या अर्धांगिनी सक्रिय
प्रमोद सुकरे - कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ हॉट बनला आहे़ पृथ्वीराज चव्हाण, डॉ़ अतुल भोसले, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे़ सर्वच पक्षांच्या रडारवर कऱ्हाड आहे़ गडकरी, ठाकरे, तावडे, खोत, जानकर यांच्या तोफा येथे धडाडल्या आहेत़ पृथ्वीराज चव्हाणांची तोफ राज्यभर धडाडत आहे़ त्यामुळे त्यांच्या अर्धांगिनी सत्त्वशीला चव्हाण प्रचारात सक्रिय झाल्या आहेत़
विधानसभेची निवडणूक सध्या ऐतिहासिक वळणावर आहे़ युतीचे तुकडे अन आघाडीत बिघाडी झाल्याने चौरंगी, पंचरंगी लढती सर्वत्र पाहायला मिळत आहेत़ कऱ्हाड दक्षिणेत तर डझनभर उमेदवार रिंगणात आहेत़ राष्ट्रवादी वगळता सर्व पक्षांचे झेंडे मतदारसंघात फडकत आहेत़ युती-आघाडीचे राजकारण अवगत असणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र पंचाईत झाली आहे़
निवडणुकीच्या प्रचारात आता महिलाही आघाडीवर आहेत़ माजी ुमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण सध्या कऱ्हाडात तळ ठोकून आहेत़ दररोज तीन-चार गावांत पोहोचून महिलांच्या छोट्या बैठका घेऊन सुसंवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़, तर त्यांच्या दोन स्नुषा आशा चव्हाण व गौरी चव्हाण (पुतण्यांच्या पत्नी) घरोघरी जाऊन महिलांना भेटून प्रचार करताहेत़ त्यांच्या सोबत कऱ्हाडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, आर्चना पाटील, नगरसेविका स्मिता हुलवान अशी मान्यवर महिलांची टीम पाहायला मिळत आहे़
भाजपचे उमेदवार डॉ़ अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसले व पत्नी गौैरवी भोसलेही प्रचारात सक्रिय झाल्या आहे़ कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्थांमधील महिला पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गावोगावी अन शहरातील प्रभागात जाऊन छोट्या-छोट्या बैठकांवरच त्यांचा भर आहे़
याउलट आमदार विलासराव पाटील-उंडाळकर मात्र ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसत आहेत़ त्यांच्या कुटुंबातील कोणीही महिला प्रचारात दिसत नाही़ जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, रोहिणी जंगम, वैजंता अडसूळ, पंचायत समिती सदस्या ललिता थोरात, सुषमा कोळेकर आदी महिला कार्यकर्त्या मात्र उंडाळकरांसाठी घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत़
कऱ्हाड दक्षिणमध्ये यंदा मोठी चुरस निर्माण झाल्याने मातब्बर उमेदवारांच्या घरातील महिला प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतेय़ पतीच्या प्रचारासाठी अर्धांगिनी तर धावून येणारच, अशी चर्चा सुरू आहे़
सासूबार्इंकडून बाळकडू
सत्त्वशीला चव्हाण यांना त्यांच्या सासूबाई दिवंगत प्रेमलाताई चव्हाण यांच्याकडून प्रचाराचं बाळकडू मिळाल्याचं मानलं जातं़ इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेनंतर पे्रमलाकाकींनी कऱ्हाडात घराघरात जाऊन महिलांना भेटून काँग्रेसच्या प्रवाहात आणले होते. डॉ़ अतुल भोसलेंसाठी प्रचारात उतरलेल्या गौरवी भोसलेंना तर माहेरकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे़ वडील आमदार दिलीप देशमुख व चुलते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या तालमित त्या तयार झाल्यात म्हणे!
एकमेव महिला उमेदवार
कऱ्हाड दक्षिणेत प्रचारासाठी उमेदवारांच्या कुटुंबातील महिला अन कार्यकर्त्या महिला मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत़ पण या मतदारसंघातून अॅड़ विद्युल्लता मर्ढेकर या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे त्याही बाहेरून येऊन कऱ्हाडात उभ्या राहिल्या आहेत़