शाहूपुरीमध्ये आता घर तिथे नळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:45+5:302021-09-10T04:46:45+5:30
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने वाढीव भागाच्या विकासाची गाडी गतिमान झाली आहे. शाहूपुरीसाठी वरदान ठरणाऱ्या कण्हेर पाणी योजनेचे ...
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने वाढीव भागाच्या विकासाची गाडी गतिमान झाली आहे. शाहूपुरीसाठी वरदान ठरणाऱ्या कण्हेर पाणी योजनेचे कामही आता प्रगतीपथावर आहे. हे काम मार्गी लागताच येथील रहिवाशांचे ‘७ दिवस २४ तास’ पाण्याचे स्वप्न साकार होणार असून, पालिका प्रशासनाकडूनही ‘घर तिथे नळ’ ही संकल्पना राबविली जाणार आहे.
सातारा शहरालगत असलेली शाहूपुरी ग्रामपंचायत विस्ताराने सर्वात मोठी आहे. २०११च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २९ हजार ५०० इतकी नोंदविण्यात आली असून, गेल्या दहा वर्षांत ती ४० हजारांवर पोहोचली आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही ग्रामपंचायत पालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे येथील मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आता पालिकेच्या खांद्यावर आली आहे.
लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात येथील रस्ते, पथदिवे, बंदिस्त गटार व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कण्हेर पाणी योजनेला प्राधान्य दिले आहे. कण्हेर पाणी योजना २०१५मध्ये प्रस्तावित झाली. परिपूर्ण सर्वेक्षणानंतर बारा कोटी रुपये अतिरिक्त या योजनेसाठी मंजूर करण्यात आले. कण्हेर धरण ते शाहूपुरी यादरम्यान साडेदहा किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली आहे. पंपगृहात दीडशे एचपीचे तीन पंप व एक पंप स्टॅण्डबाय ठेवण्यात येणार आहे. योजनेचे पाणी सायपन पद्धतीने आणले जाणार आहे. सुमारे ४० हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या साडेतीनशे मीटर पाईपलाईनचे काम सारखळ खिंडीतील वन विभागाच्या हद्दीतून होणार आहे. या कामाला सातारा वन विभागाने मान्यता दिल्याने हे कामही आता युद्धपातळीवर सुरू आहे. या भागात आतापर्यंत जीवन प्राधिकरणकडून पाणी पुरवठा केला जात होता. यापुढे नागरिकांना कण्हेर योजनेचे पाणी मिळणार असून, कृष्णा उद्भवातील साडेचार हजार नळ कनेक्शन कण्हेर योजनेकडे हस्तांतरित होणार आहेत.
(चौकट)
नागरिकांच्या अपेक्षा
- आदर्श कॉलनीतील मैला खड्डा येथे क्रीडा संकुल
- खुल्या जागांचा विकास
- मुलांसाठी खेळाचे मैदान, व्यायामशाळा
- ज्येष्ठ नागरिक, महिलांना योगासन हॉल, विरंगुळा केंद्र
- रस्त्यांचे रुंदीकरणासह डांबरीकरण
- अत्यावश्यक ठिकाणी पथदिवे
(चौकट)
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कण्हेर पाणी पुरवठा योजना आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या योजनेचे सर्व तांत्रिक अडथळे आता संपले आहेत. येत्या काही दिवसात ही योजना पूर्णत्वास येत असून, पालिका प्रशासनाकडून ‘घर तेथे नळ’ हा उपक्रम राबवून नागरिकांना नवीन नळ कनेक्शनही दिली जाणार आहेत.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
(चौकट)
योजनेची वैशिष्ट्य
- सायपन पद्धतीने कण्हेर योजनेचे पाणी येणार
- वीज खर्चात २५ टक्के बचत
- शाहूपुरीकरांना चोवीस तास मुबलक पाणी
- दररोजचा तीन एमएलडी (दलघमी) पाण्याचा उपसा
- कृष्णा पाणी योजनेवरील भार कमी होणार