होमगार्ड सोडणार आता पोलिसांची साथ; शासनाकडून पाच कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:49 AM2020-01-14T00:49:42+5:302020-01-14T00:50:36+5:30
हा नियमानुसार करार रद्द झाला असला तरी दुसरा करार मात्र पोलिसांच्या ताणतणावात भर घालणारा आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमन करण्यासाठी जिल्हा समादेशक कार्यालयाकडून होमगार्डस्ना पोलिसांच्या सोबत बंदोबस्तासाठी पाठविले जात होते.
दत्ता यादव ।
सातारा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उन्हा-तान्हात उभ्या असणाऱ्या होमगार्डस्ना नाईलाजाने पोलिसांची साथ सोडावी लागलीय. गेल्या तीन महिन्यांपासून शासनाकडून थकीत अनुदान न मिळाल्याने होमगार्डस्च्या राज्य पातळीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पोलिसांना आता वाहतूक नियमन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होताना दोन वर्षांसाठी होमगार्डस्ची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरच्या बंदोबस्ताची मुदत संपल्याने होमगार्डस्नी बंदोबस्त बंद केला आहे. हा नियमानुसार करार रद्द झाला असला तरी दुसरा करार मात्र पोलिसांच्या ताणतणावात भर घालणारा आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमन करण्यासाठी जिल्हा समादेशक कार्यालयाकडून होमगार्डस्ना पोलिसांच्या सोबत बंदोबस्तासाठी पाठविले जात होते. त्यामुळे पोलिसांना मोठा हातभार लागत होता. एवढेच नव्हे तर पोलिसांना तपासासाठी वेळदेखील मिळत होता.
उन्हा-तान्हात धुळीमध्ये पोलिसांसोबत उभ्या राहणाºया होमगार्डस्ना मात्र गेल्या काही महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्यामुळे सर्व होमगार्डस् बिनापगारी काम करत होते. जिल्ह्यात ६४० होमगार्डस्ची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. एका दिवसाला एका होमगार्डला ६७० रुपये दिले जातात. असे महिन्याकाठी प्रत्येक होमगार्डला २० हजार १०० रुपये मानधन मिळत होते.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून होमगार्डस्चे मानधन मिळाले नसल्यामुळे शासनाकडे तब्बल पाच कोटींहून अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांसोबत वाहतूक नियमनामध्ये तैनात असलेल्या होमगार्डस्ना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्याच्या होमगार्ड महासमादेशकांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार होमगार्डना वाहतूक नियमनातून बाजूला करण्यात आले आहे.
पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे होमगार्डची पोलिसांना चांगली साथ मिळत होती. ज्या ठिकाणी सहा ते सात पोलीस आवश्यक होते. त्या ठिकाणी केवळ तीन होमगार्डस्मध्ये काम सुरळीत पार पडले जात होते. मात्र, आता या पुढे पोलिसांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. होमगार्ड असताना पोलिसांना थोडा दिलासा तरी मिळत होता. परंतु आता ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. पोलिसांच्या सोबतीला आता होमगार्ड नसल्यामुळे पोलिसांवरील ताण साहजिकच वाढण्याची शक्यता आहे.
- जे अधिकार पोलिसांना तेच होमगार्डना
वाहतूक नियमन करताना अनेकदा होमगार्डस्ना वाहनचालकाकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. होमगार्डना कोणतेच अधिकार नाहीत, अशी अनेकांची समज आहे. परंतु वास्तविक जे अधिकार पोलिसांना आहेत तेच अधिकार होमगार्डना आहेत. वाहतूक नियमन करताना एखाद्याने अरेरावी केली तर होमगार्डसही शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू शकतो.
- ..पण इथे होमगार्ड तैनात असतील
सातारा जिल्ह्यात १ हजार ४८२ होमगार्ड आहेत. या होमगार्डना पोलिसांसोबत असलेल्या वाहतूक नियमनातून परत बोलविण्यात आले असले तरी यात्रा, गणेशोत्सव, निवडणूक या ठिकाणी होमगार्ड तैनात असणार आहेत. होमगार्डना कामावरून कमी केले आहे, अशीही अफवा पसरवली जात होती. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन होमगार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.