आमदारांवर हनी ट्रॅपचे षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:19+5:302021-04-30T04:50:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना ''हनी ट्रॅप''मध्ये अडकविण्याचे षडयंत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना ''हनी ट्रॅप''मध्ये अडकविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या दोघा संशयित आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करून त्यांना ''हनी ट्रॅप''मध्ये अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असा डाव शैलेश मोहिते-पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेडगे या तिघांनी एका युवतीच्या मदतीने आखला होता. मात्र, संबंधित युवतीनेच या प्रकाराची माहिती आमदारांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांना दिली होती. यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असतानाच या प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या युवतीनेच आता आपला विनयभंग झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
दि. १५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता युवती घरात एकटी असल्याचे पाहून वरील दोघा संशयितांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून युवतीचा विनयभंग केला. यावेळी शैलेश मोहिते पाटील याने युवतीच्या व्हाट्सॲपवर अश्लील भाषेत चॅटिंग केल्याचे समोर आले आहे.
हे दोघे अद्याप पोलिसांना सापडले नसून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत.