राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंवर हनी ट्रॅप; रोख रक्कम व पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:32 AM2021-04-25T00:32:48+5:302021-04-25T06:44:14+5:30
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षड्यंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भंडाफोड केला असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे.
शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भीतीने त्यांच्याकडून लाखो रुपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भंडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले. २२ एप्रिल रोजी साताऱ्यातील त्या युवतीने मयूर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला.
रोख रक्कम व पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष
आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करण्यासाठी काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे संशयितांनी त्या युवतीला आमिष दाखवले होते. त्याबदल्यात तिला वेळोवेळी ९० हजार रुपये देण्यात आले. मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयूर यांना फोन करून सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नव्हती.