टाकाऊ लाकडांपासून त्याने बनवल्या मधपेट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:01+5:302021-05-30T04:30:01+5:30
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने सर्वच समिकरणे बदलून गेली. कोणाची रोजीरोटी थांबली तर कोणाचा व्यवसाय बंद पडला. मात्र, या ...
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने सर्वच समिकरणे बदलून गेली. कोणाची रोजीरोटी थांबली तर कोणाचा व्यवसाय बंद पडला. मात्र, या संकटातूनही अनेकजण उभारी घेऊ लागलेत. जो-तो आपल्या कल्पनाशक्तीने संकटावर मात करू लागलाय. महाबळेश्वर तालुक्यातील गावढोशी येथील एका तरूणानेही लॉकडाऊनमध्ये असाच जुगाड केला आहे. त्याचा हा जुगाड आता त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलाय.
सागर सपकाळ असं या तरुणाचं नाव आहे. सागरने मरिन इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतले आहे. एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, लॉकडाऊनचा फटका जसा इतरांना बसला तसा त्यालाही बसला. गावढोशी या आपल्या गावी परतल्यानंतर सागर स्वस्थ बसला नाही. आपण आपल्या बुद्धीचा कुठेतरी उपयोग करायला हवा, असं त्याला नेहमीच वाटत होतं. तो ज्या परिसरात राहतो त्या परिसराला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. लक्षावधी प्राणी-प्रजाती या जंगलात अधिवास करतात. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या सागरने या निसर्गसंपदेचा फायदा घेत मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने त्याने पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली.
मधुमक्षिका पालनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मधपेट्या. बाजारपेठेत एका मधपेटीची किंमत दीड ते दोन हजार रुपये इतकी आहे. सुरुवातीलाच मोठं भांडवल गुंतवणे त्याच्या पचनी पडले नाही. त्यामुळे आपण स्वतः टाकाऊ वस्तूंचा वापर करून मधपेट्या तयार केल्या तर अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे त्याला वाटले आणि सागरने वेळ न दवडता मधपेट्या तयार करण्यास सुरुवात केली. प्लायवूडचे तुकडे, लाकूड, खिळे, हातोडा, करवत, पोत्यांची सुतळी अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून सागरने वडील चंदर सपकाळ (गुरुजी) यांच्या मदतीने मधपेट्या बनविण्यास सुरुवात केली. गतवर्षी तब्बल चाळीस तर यंदा त्याने पंधरा पेट्या तयार केल्या.
गावढोशी गावातील संपूर्ण रानात व स्वतःच्या आमराईत सागरने या मधपेट्या लावल्या आहेत. अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सागरने मधुमक्षिकापालन सुरू केले आणि यंदा तब्बल ४० किलो मधाची विक्रीदेखील केली. कोरोना व लॉकडाऊनमुळे ओढावलेल्या संकटांपुढे हतबल न होता, सागरने आपल्या कल्पनाशक्तीतून काहीतरी वेगळं केलं. इतकंच नव्हे तर रोजगाराचा मार्गदेखील शोधून काढला. त्याचा हा प्रयत्न तरुणांसाठी नक्कीच दिशादर्शक असा आहे.
(चौकट)
अनेकांना मिळाला रोजगार
सागरने स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मधपेट्यांमुळे गावढोशी पंचक्रोशीतील अनेकांना नवा रोजगार मिळाला आहे. सागरने आतापर्यंत अनेक गावकऱ्यांना मध उत्पादनासाठी पेट्या देऊ केल्या. मधपेटी नेणं, ती आपल्या रानात लावणं, त्यातून मधाचं उत्पादन घेणं व पुन्हा मधपेटी परत करणं, असा दिनक्रम येथील तरुण व गावकऱ्यांचा सुरु झाला आहे.
फोटो मेल: