मुलाच्या कर्तृत्वाच्या सत्काराचा पितृत्वाला सन्मान
By admin | Published: February 9, 2015 09:18 PM2015-02-09T21:18:16+5:302015-02-10T00:26:51+5:30
युवकाच्या आदरभावनेचा आदर्श : प्रतिकूल परिस्थितीत अशोक प्रभाळकर बनला वकील
घन:शाम कुंभार - यड्राव -समारंभ कर्तृत्वाच्या सन्मानाचा, सत्कामूर्तीस सन्मानासाठी पुकारले. . . सत्कारमूर्तीने स्टेजवर येऊन पहिला बोलण्याची विनंती. . . सत्कारानंतर बोलायला आयोजकांनी सांगितले. तरीही माईक पुढे घेऊन सत्कार माझा नको, माझ्यासाठी अहोरात्र राबलेल्या माझ्या वडिलांचा व्हावा, त्यांच्याचमुळे मला यश मिळाल्याची भावना प्रकट झाली आणि सर्वत्र भावपूर्ण वातावरण झाले. वडील स्टेजवर आले सत्कार झाला; पण मुलाच्या कर्तृत्वामुळे पितृत्वाच्या सत्काराची कृतज्ञता प्रकटली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत वकील झालेल्या येथील अशोक सुभाष प्रभाळकर या युवकाने आदरभावानेचा नवा आदर्श उभा केला.आठवड्यातील सहा दिवस काम करणे व सुटी दिवशी विधी शाखेच्या महाविद्यालयात जाऊन आठवड्याचा अभ्यास करणे, असा दिनक्रम अशोकचा सुरू होता. शिक्षणाची जिद्द पाहून सहकारी मित्रांनीही अभ्यासाबाबत मार्गदर्शन, प्रसंगी आर्थिक सहाय, प्रवासखर्चाची मदत मुसीर बुखारी या मित्राने केली. यामुळे परीक्षा फॉर्म भरणे सोईचे झाले.
शिकण्याची ओढ कष्टाची तयारी, वडिलांचे स्वप्न साकार करण्याची मनीषा असल्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तुंग यश मिळू शकते, हे अशोक प्रभाळकर या युवकाने सिद्ध केले आहे.प्रतिकूल परिस्थितीत वकील झाल्याबद्दल यड्राव ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात अशोकने आपले वडील सुभाष प्रभाळकर यांना आपल्या कर्तृत्वाचा सन्मान स्वीकारण्याचा मान दिला अन् सारे सभागृह भारावून गेले. सध्या दुसऱ्याचे श्रेय स्वत:ला घेऊन मिरवण्याची प्रथा काही ठिकाणी पाहावयास मिळते, अशा स्थितीत वडिलांसह परिवाराने आपल्या शिक्षणासाठी हालअपेष्ठा सोसल्या याची जाण ठेवून वडिलांच्या कष्टाचा सन्मान व्हावा, या सद्भावनेने स्वकतृत्वाच्या सत्काराचा सन्मान पितृत्वाला देऊन मनाचा मोठेपणा सिद्ध केला आहे. नव्या पिढीपुढे एक आदर्श ठेवला आहे. वडिलांचे स्वप्न साकारल्याची कृतज्ञता व्यक्त झाली. वडिलांनी सत्कारानंतर ग्रामस्थांना केलेला नमस्कार म्हणजे, जीवन सार्थकतेचे प्रतीक असल्याची उत्कट प्रतिक्रिया होती. गावालाही अभिमान आहे, संघर्षातूनही यशाचा झेंडा लावणाऱ्या युवकांची.
मागावर काम करून अभ्यास
आपल्यास शिक्षण घेता आले नाही, तर मुलांनी चांगले शिकावे हे स्वप्न, त्यासाठीची धडपड. त्यातच ह्रदयविकाराचा त्रास उद्भवला त्यासाठी ऊसने पैसे घेऊन उपचार, त्यातून बरे होवून नव्या उमेदीने काम सुरू. ही वडिलांची धडपड पाहून अशोकनेही मागावर काम करून अभ्यासास सुरूवात केली. प्रसंगी कांड्या भरणे, फावल्यावेळी फळे विकणे ही कामे अर्थाजनासाठी सुरू केली, सोबत शिकण्याची जिद्द होतीच.