सन्मान देशसेवेचा... उपक्रम उंब्रजकरांचा; सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:19 AM2018-10-02T00:19:54+5:302018-10-02T00:20:00+5:30
उंब्रज : मिरवणुका अनेक निघतात. मात्र, उंब्रजकरांनी रविवारी रात्री पाहिली ती मिरवणूक काही वेगळीच होती. ही मिरवणूक म्हणजे एक सन्मान होता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शौर्याचा. हा सत्कार होता घरादाराचा त्याग करून देशासाठी दिलेल्या योगदानाचा. हा सन्मान होता उंब्रजकरांनी आपल्या भूमीतल्या जवानांप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेचा!
उंब्रजमधील जवान १८ वर्षे देशसेवा करून परत गावात आला. रस्त्यावरच त्याचे शेकडो ग्रामस्थांनी स्वागत केले. गाडीत बसवून वाजत-गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली आणि त्याचा सत्कार केला. अशी घटना जवानांच्या आयुष्यात दुर्मीळच. मात्र, हे घडवलं उब्रजकरांनी. सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिकांचा म्हणून ओळखला जातोच. तसाच तो देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया जवानांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्यातील हजारो युवक आजही देशसेवेत सीमेवर उभे ठाकलेले दिसून येतात. अशा पार्श्वभूमीवर असलेल्या या जिल्ह्याला सैनिकांविषयी आपुलकी व प्रेम आहेच. याच जिल्ह्यातील उंब्रजचा जवान सुनील जाधव हा अठरा वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त होऊन घरी येतोय, हे त्याच्या मित्रांना व ग्रामस्थांना समजले आणि या जवानाचे गावात जंगी स्वागत करून त्याची मिरवणूक काढून त्याचा सत्कार केला.
रविवारी सायंकाळी येथील महामार्गावर जवान सुनील जाधव यांच्या मित्र परिवार व ग्रामस्थांनी गर्दी केली. दिमतीला बेंजो पथक, ओपन जीप तयार ठेवण्यात आली होती. सुनील जाधव यांनी उंब्रजमध्ये पाऊल ठेवले आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्याबरोबरच सेवानिवृत्त झालेले त्याचे मित्र गडहिंग्लज गावचे अजय गोसावी हेही होते. या दोघांना ओपन जीपमध्ये बसवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक उपमार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. तेथे या दोन जवानांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. त्यानंतर पुन्हा ही मिरवणूक बाजारपेठेतून ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराजवळ आली.