आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होणे हीच आदरांजली
By Admin | Published: November 2, 2014 09:02 PM2014-11-02T21:02:57+5:302014-11-02T23:32:43+5:30
गारळे : सुवर्णकन्या नंदा जाधव यांच्या १५ व्या स्मृतिदिनी सत्तर जणांचे रक्तदान
सातारा : ‘प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने वाटचाल करत सातारची आंतरराष्ट्रीय धावपटू व महाराष्ट्राची सुवर्णकन्या दिवंगत नंदा जाधव हिने यश संपादन केले होते. नंदा जाधव ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून देशाचे व सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला होता. जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होणे हीच खरी नंदा जाधव हिला आदरांजली ठरेल,’ असे उद्गार महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय धावपटू व महाराष्ट्राची सुवर्णकन्या दिवंगत नंदा जाधव हिच्या १५ व्या स्मृतिदिनी नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी शिरीष कुलकर्णी, राष्ट्रीय अॅथलेटिक पंच राजेंद्र कामटे, नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठनचे अध्यक्ष शंकरराव जाधव, ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले, पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे उपस्थित होते.
गारळे म्हणाले, ‘नंदा जाधवची खेळाप्रती असलेली चिकाटी व जिद्द पाहिली होती. कोणत्याही सोयी-सुविधा नसतानाही नंदाने अलौकिक यश संपादन केले होते. सातारा शहरात खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनी उभारली जावी. हे नंदाचे अखेरचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पायात बूट नसताना, अंगावर ट्रॅकसूट नसताना केवळ साध्या कपड्यांवर नंदा दिवसदिवस सराव करत होती. तिच्या याच जिद्दीने तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश संपादन केले. ती असती तर साताऱ्यातून अनेक खेळाडू तिने तयार केले असते.’
कुलकर्णी म्हणाले, ‘कित्येक स्पर्धांना जाण्यासाठी लोकवर्गणी गोळा करून नंदा स्पर्धांना जात होती. नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदरांजली वाहण्यात येते हा उपक्रम खरोखचे स्तुत्य आहे.’
यावेळी ७० हून अधिक नागरिक व खेळाडूंनी रक्तदान केले. यावेळी राजेंद्र पवार व प्रदीप पालकर यांच्या सर्व कुटुंबीयांनी रक्तदान करून अनोख्यारीतीने नंदा जाधव यांना आदरांजली वाहिली. अशोकराव पवार, बी. आर. पाटील, डॉ. प्रशांत कापरे, डॉ. जयदीप चव्हाण, संजय जाधव, डॉ. प्रवीण जाधव, विजय पाटील, बाळासाहेब जाधव, प्रणव टंकसाळे, प्रा. राजेंद्र कुंभार, दिनकराव भोसले, मोहन यादव, मनोज जाधव उपस्थित होते. सुरेश साधले यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पवार यांनी आभार मानले केले. (प्रतिनिधी)