गाव कारभाऱ्यांच्या योगदानाची सन्मानातून उतराई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:27+5:302021-07-03T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा कणा आहे. गावाचा सरपंच हा विकासाचा दूत म्हणून काम करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा कणा आहे. गावाचा सरपंच हा विकासाचा दूत म्हणून काम करीत असतो. सरपंचांचे काम प्रेरक असेल, तर गाव विकासाच्या प्रवाहात अग्रेसर राहते. गावाला विकास वाटेवर ठेवणाऱ्या आजवरच्या सर्व गाव कारभाऱ्यांचा गावाच्या वतीने सन्मान करून त्यांच्या योगदानातून उतराई होण्यात आले. या अनोख्या उपक्रमातून सांगवी गावाने एकीचे दर्शन घडविले आहे.
खंडाळा तालुक्यातील सांगवी हे छोटेसे गाव आहे. या गावाच्या ग्रामपंचायतीला ५२ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ग्रामपंचायतीचा वर्धापन दिन व गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या गेल्या पन्नास वर्षांतील सर्व सरपंच व उपसरपंचांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, सरपंच सोमनाथ लोखंडे, उपसरपंच संतोष वीर, संदीप वीर, आकाश कांबळे, भाग्यश्री वीर, अनिता वीर, कुसुम वीर, मनीषा वीर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगवी गावाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसचिवालय, प्राथमिक शाळा व इतर वास्तू प्रशस्तपणे बांधून घेतल्या आहेत. शिवाय गावातील पाणीपुरवठा, रस्ते, गटार यासह अन्य मूलभूत विकासाची कामे चांगल्या रीतीने केली आहेत. यासाठी सर्व माजी सरपंच, उपसरपंचांचे मोठे योगदान होते. त्याचीच उतराई सर्वांच्या एकत्रित सत्कारातून गावकऱ्यांनी केली.
याप्रसंगी नितीन भरगुडे म्हणाले, ‘सांगवी गावाने विकासाच्या प्रक्रियेत नेहमी पुढचे पाऊल टाकले. गावाची एकी ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. त्यातूनच गावगाडा चालवताना विकासाला दिशा मिळते. कोरोना काळातही गावाने ग्रामस्थांची चांगली काळजी घेतली. लोकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कारातून पुढील कामास प्रोत्साहन मिळेल.’
यावेळी कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करणारे आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, बचतगट समन्वयक यांचाही सन्मान करण्यात आला.
कोट..
सांगवी गावाने एकीतून गावाच्या विकासाचा नवा पायंडा पाडला आहे. सर्वांच्या एकत्रित सत्काराने कारभाऱ्यांचे मनोबल वाढते. इतर गावांसाठी हा प्रेरणादायी संदेश आहे. वृक्षारोपणातून गावाचा परिसर हिरवागार करण्याचा त्यांचा मानस कौतुकास्पद आहे.
-राजेंद्र तांबे, सभापती
.....................................................
फोटो मेल केला आहे.