निमित्त हुरडा पार्टीचं.. मैफल चळवळीची! : सामाजिक संस्थेच्या सदस्यांचे असेही कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:07 AM2018-03-11T00:07:11+5:302018-03-11T00:07:11+5:30
वडूज : सध्या सगळीकडेच सुगीची लगबग सुरू आहे. शेतकरी वर्गाला उसंत घ्यायला सवड नसताना देखील तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील
शेखर जाधव ।
वडूज : सध्या सगळीकडेच सुगीची लगबग सुरू आहे. शेतकरी वर्गाला उसंत घ्यायला सवड नसताना देखील तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील रुक्मिणी शामराव मांडवे व त्यांच्या स्नुषा अरुणा भगवान मांडवे यांनी ‘हुरडा पार्टी’चे नियोजन करून समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे. या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केलेल्या कौतुक सोहळ्यामुळे ‘हुरडा खरंच......लयभारी’ असे म्हणत संस्थेच्या पदाधिकारी यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
वडूज येथील प्रयास सामाजिक संस्था, हृदय मित्र संघटना व ट्रेकर ग्रुपच्या माध्यमातून आजअखेर अनेक नावीन्यपूर्ण सामाजिक कार्ये झालेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रयास सामाजिक संस्थेचे उल्लेखनीय कार्य म्हणजे येरळानदी(वेदावती) पुनर्जीवन, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम, पर्यावरणाचा ºहास थोपविण्यासाठी अनेक अनोखे मार्गदर्शनपर प्रबोधन तसेच हृदय मित्र संघटना यांचेदेखील पर्यावरणपूरक उपक्रम याच बरोबरीने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया परंतु समाजसाठी वेळ देणाºया ट्रेकर ग्रुपचे ही तालुक्यासह जिल्ह्यातील गड, किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षलागवड व जोपासण्याचे कार्य मोलाचे आहे.
शासन स्तरावर आजअखेर कोणीच दखल घेतली नाही; परंतु खटाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील कुमठे येथील रुक्मिणी मांडवे व अरुणा मांडवे यांनी या संस्थेतील सदस्यांना हुरडा पार्टीसाठी आमंत्रित केले होते.
या सामाजिक संस्थेतील सदस्यांच्या कार्याची दखल घेऊन या मांडवे कुटुंबीयांनी त्यांचा हुरडा पार्टी देऊन यथेच्छ पाहुणचार केला. या आगळ्या वेगळ्या पाहुणचाराने सामाजिक संस्थेचे सदस्य भारावून गेले आणि या मांडवे कुटुंबातील माउली-भगिनीने दिलेले वात्सल्य प्रेमाची शिदोरी बांधली. आपली जबाबदारी खूपच वाढल्याची जाणीव या सदस्यांना या ठिकाणी जाणवली. जाहीर सत्कार, सन्मान व पुरस्काराने पुलकित न होणारे हे सदस्य काहीकाळ ते भावनिक ही झाले होते. असा पाठीवर थाप टाकणारा प्रसंग म्हणजे आयुष्यातील फार मोठी पुंजी समजतो, असे भावोद्गार सर्व सदस्यांनी काढले.