जंबो कोविडमध्ये रुग्णांचा पाहुणचार ठरतोय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:58+5:302021-05-05T05:04:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जंबो कोरोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा त्यांच्या नातेवाईकांकडून होणारा पाहुणचार सध्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी बनू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जंबो कोरोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा त्यांच्या नातेवाईकांकडून होणारा पाहुणचार सध्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी बनू लागला आहे. चहा, नाष्ट्यासह जेवणाची सोय असलेल्या या सेंटरमध्ये नातेवाईक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कंटेनरमध्ये चहा, नाष्टा आणि जेवण देत आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी सोय देताना या कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक होत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सर्वोत्तम सोय असणाऱ्या सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये शासनाकडून विनामूल्य चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय केली जाते. मात्र कोणाला येथील अन्नाची चव पसंत पडेना, तर काहींना घरच्या जेवणाची आठवण येऊ लागल्याने ही पार्सल सुविधा नातेवाईकांनी सुरू केली आहे. कोविड रुग्णालयातील भांडे आपल्या घरी आणायला नको म्हणून यूज अॅण्ड थ्रो कंटेनरमधून नातेवाईक पार्सल पोहोच करत आहेत. दिवसातून तीनदा नातेवाईकांची ही सेवा करता कर्मचारी वैतागले आहेत.
कोविड काळात आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कुटुंबियांना सेंटरमध्ये बोलावून त्यांना संकटात टाकण्याची दाखल रुग्णांची वृत्ती जशी चुकीची आहे, तसेच काही दिवस सहन करा, घरी आला की वाट्टेल ते खावा, हे ठणकावून सांगण्यात कुटुंबीयही कमी पडत आहेत. परिणामी सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून हे अन्न रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. एकच काम वारंवार करावे लागत असल्यामुळे हे कर्मचारीही अक्षरश: वैतागले आहेत.
चौकट :
प्लास्टिक पिशव्यांतून चहा अन् नाष्टाही
जंबो कोविड सेंटरमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ देताना ते प्लास्टिकच्या पिशव्यांतून देण्याकडे नातेवाईकांचा कल आहे. चहा आणि कॉफीसुध्दा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देण्यात येते. अनेकदा एकसारख्या पिशव्या असल्यामुळे कोणती पिशवी कोणाची, हेही समजून येत नाही. यावर उतारा म्हणून काही नातेवाईकांनी पिशव्यांवर नाव टाकून देण्याचाही प्रयोग अवलंबला आहे.
पॉईंटर :
जंबो सेंटरमधील जेवणाची व्यवस्था
सकाळी ७ वाजता चहा-नाष्टा
दुपारी १२ वाजता जेवण
संध्याकाळी ४ वाजता चहा
रात्री ८ वाजता जेवण
कोट :
जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना चहा, नाष्टा आणि जेवण विनामूल्य पुरवले जाते. प्लास्टिक पिशव्यांचा अमर्याद वापर पाहता, प्रशासनाने प्लास्टिक पिशव्या आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल.
- प्रशांत मोदी, सामाजिक कार्यकर्ते