हाॅटेलसारखी आता रुग्णालयेही चालविण्यास घेतली जातायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:29+5:302021-09-08T04:47:29+5:30
सातारा : कोरोनाने भल्या भल्या व्यावसायिकांनाही रसातळाला लावले. अनेक कंपन्या, उद्योग बंद पडले. एवढेच नव्हे तर अनेकांचे रोजगारही गेले; ...
सातारा : कोरोनाने भल्या भल्या व्यावसायिकांनाही रसातळाला लावले. अनेक कंपन्या, उद्योग बंद पडले. एवढेच नव्हे तर अनेकांचे रोजगारही गेले; मात्र यात तग धरून राहिला तो म्हणजे वैद्यकीय व्यावसाय. या व्यावसायाला कोरोनामुळे एक नवी संधीच चालून आली. हीच संधी ओळखून अनेकांनी आता जसी भाड्याने हाॅटेल चालविण्यास घेतली जातायत तसी आता रुग्णालयेही चालविण्यास घेतली जात आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय व्यावसायाचे कसलेही ज्ञान नसणाऱ्या व्यक्ती या नवख्या व्यावसायात उतरत असल्याचे धक्कादायक वास्तव साताऱ्यात समोर आलंय.
जिल्ह्यात पावणेदोन वर्षांपूर्वी २४ मार्चला पहिला लाॅकडाऊन लागला. त्यानंतर सारेच व्यावसाय अनिश्चीत काळासाठी बंद झाले. सलग तीन महिने कडक लाॅकडाऊन झाल्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी होऊ लागली. उद्योग विश्व तर पुरते ढासळले. परिणामी, कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे साहजिकच बेरोजगारीही वाढली. छोटे, मोठे व्यवसायही बंद पडले. यात फक्त वैद्यकीय व्यावसायाला भरभराटीचे दिवस आले. हेच दिवस पाहून अनेकांच्या ताेंडाला पाणी सुटले. या व्यवसायात बक्कळ पैसा आहे. हे समजल्यानंतर वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसणाऱ्यांना श्रीमंतीची स्वप्न पडू लागली. एखादे हाॅटेल भाड्याने घेताना जसी प्रक्रिया करावी लागतेय, याउलट रुग्णालय सुरू करण्यासाठी वेगळी प्रक्रिया काहीच नाही. बंद पडलेल्या रुग्णालयाची इमारत भाड्याने घेऊन त्यामध्ये संचालक मंडळांचा भरणा केला जातोय. हे संचालक मंडळ जर पाहिले तर कोण वकील, कोणी दुकानदार तर कोणी नोकरदार आहेत. या लोकांनी फक्त भाड्याने घेतलेल्या हाॅस्पिटलमध्ये पैसे गुंतवलेत. डाॅक्टरांची टीम तयार करून वेगवेगळ्या रोगावरील डाॅक्टरांना परव्हिजीट पैसे दिले जातायत. हे डाॅक्टर आपल्या ठराविक वेळेनुसार रुग्णालयात येतात. डाॅक्टरांचे पैसे दिल्यानंतर उरलेली रक्कम हे गुंतवणूकदार आपापसात वाटून घेत आहेत. कोराेनापूर्वी अशी परिस्थिती नव्हती; मात्र कोरोनानंतर यात बदल झाले. कोरोनाच्या धास्तीने वयस्कर डाॅक्टरांनी आपली हाॅस्पिटले बंद केली. तर काही डाॅक्टरांनी दुसऱ्या शहरात नव्याने दवाखाने सुरू केले. त्यामुळे या इमारती पडूनच होत्या. याच संधीचा आता अशा लोकांनी फायदा घेऊन वैद्यकीय व्यावसायात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळतेय.
चाैकट : जबाबदारी कोणाची...
रुग्णालये चालविण्यास घेऊन त्यातून बक्कळ पैसा कमविला जातोय; पण एखाद्या रुग्णाच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास नेमकी जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजे आता रुग्णालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय पदवीची आवश्यकता नाही. केवळ पैसा असला म्हणजे रुग्णालयेही आता हाॅटेलसारखी चालविण्यास घेऊ शकतो, याचा नवा फंडा अनेकांना सापडलाय.