हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरीही थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:23+5:302021-04-12T04:37:23+5:30

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या-मोठ्या हॉटेल्समधील ग्राहकांना चुलीवरच्या भाकरीने भुरळ घातली आहे. हॉटेल व्यवसायामध्ये भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ ...

Hotel ban also stopped women's vegetables and bread! | हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरीही थांबली!

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरीही थांबली!

Next

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या-मोठ्या हॉटेल्समधील ग्राहकांना चुलीवरच्या भाकरीने भुरळ घातली आहे. हॉटेल व्यवसायामध्ये भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ वाढली असून त्यामुळे ग्रामीण व उपगनरातील महिलांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, लॉकडाऊनच्या नियमामुळे हॉटेल बंद होत असल्याने या कामगार महिलांवर पुन्हा उपासमारीचे सावट येणार असल्याने महिलांची भाजी-भाकरीही आता थांबली आहे.

महामार्गावरील व उपनगर समजल्या जात असलेल्या शहराजवळच्या परिसरात नवनवीन हॉटेल्स सुरू आहेत. याठिकाणी गावरान किंवा घरगुती पद्धतीच्या जेवणासोबत विविध प्रकारच्या भाकरी बनविण्यासाठी महिलांच्या हाताला काम मिळत आहे. भाकरी बनविण्याचे घरगुती काम आता रोजगाराचे साधन बनल्यामुळे महिलांसाठी हे उपयोगी होते. या जेवणांना पसंती मिळत असल्यामुळे हॉटेलमध्ये आगाऊ नोंदणी केली, तरच ग्राहकांना जेवण उपलब्ध होत आहे. येथे खवय्यांना बनवून देण्याचे काम महिला करत होत्या.

पॉईंटर :

जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : १३८९

पोळी भाजी करणाऱ्या महिलांची संख्या : १२३२०

कोट :

१. हॉटेल व्यवसाय आधीच अडचणीत आला आहे. त्यात लॉकडाऊनच्या नियमांनी अधिक भर पडली आहे. महिन्याला चार हजार रुपये पगार देऊन भाकरी-चपाती करणाऱ्या महिलांना पगार देणंही अशक्य झालंय. त्यामुळे ऑर्डर आली की, कुटुंबातील महिला चपाती-भाकरी करून हॉटेलात पाठवतात.

– समीर थोरात, हॉटेल व्यावसायिक

२. गेली सात वर्षे मी ज्या हॉटेलात काम करत होते, त्यांनी आता काम बंद करायला सांगितलंय. हॉटेलात धंदा नाही आणि नुसतं थोड्या वेळाचं काम करून त्यांना मला पूर्ण पगार देणं शक्य नाही. मी सध्या घरीच आहे, अनेकांना सांगितलं घरकामाचीही चौकशी केली, पण कुठंही काम नाही.

- रेखा यादव, भाकरी करणाऱ्या

३. पूर्वी आमच्याकडे पोळी-भाकरी करण्यासह अन्य कामांसाठी तब्बल दहा महिला काम करत होत्या. आता मात्र अवघ्या दोघींनाच कामावर बोलवतो. उरलेल्या आठजणी मिळेल तिथे हंगामी रोजगार करून दोन वेळच्या अन्नाची सोय करतात. आमच्यासह त्यांच्यासाठी हा काळ कठीण आणि परीक्षेचा आहे.

- राजेंद्र घुले, हॉटेल व्यावसायिक.

चौकट :

वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक

मार्च २०२० पासून हाताला कामच मिळत नाही. कडक लॉकडाऊनच्या काळात हाताची सवय मोडायला नको म्हणून कम्युनिटी किचनमध्ये स्वयंसेवक म्हणून महिलांनी कामे केली. पुढं शिथिलता आल्यानंतर त्यांनी निम्म्याहून कमी पैशांवर काम सुरू करून पैसे कमाविण्याचा मार्ग अवलंबला, पण ग्राहकांची संख्या रोडावल्याने हॉटेलमालकांनी चपाती आणि भाकरीला तयार पराठ्याचाही मार्ग स्वीकारला. दिवाळीनंतर आत्ताशी कुठं सगळं जिथल्या तिथं होत नाही तोवर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं. आपल्या पगारात थोडीफार बचत आणि कर्ज काढून कुटुंबात एकेक वस्तू आणल्या खरं, पण आता त्या पुन्हा विकण्याची वेळ आल्याचं महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Hotel ban also stopped women's vegetables and bread!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.