‘हॉटस्पॉट’ येराड कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:40 AM2021-05-11T04:40:54+5:302021-05-11T04:40:54+5:30
यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, पोलीस पाटील रवी साळुंखे, प्रकाश साळुंखे, सुनील साळुंखे उपस्थित होते. पाटण ...
यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, पोलीस पाटील रवी साळुंखे, प्रकाश साळुंखे, सुनील साळुंखे उपस्थित होते. पाटण तालुक्यातील येराड-खंडूचा वाडा येथे वीस दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आलेल्या एकाची चाचणी केली असता तो कोरोनाबाधित आढळून आला. त्यानंतर पुन्हा तीन बाधित सापडले. आरोग्य विभागाने ग्रामस्थांना चाचणी करण्यास सांगितले आणि हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने १०३ ग्रामस्थांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी तब्बल ४४ बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. गावातील बाधितांचा आकडा ५९ वर पोहोचल्याने गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले. परिणामी, पाटण तालुका हादरून गेला होता. तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल कांबळे यांच्यासह ग्रामदक्षता समितीने सतर्क राहून बाधितांना मार्गदर्शन व उपचार केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले.
बाधित झालेल्या ५९ पैकी तब्बल ५६ जण गृहविलगीकरणात होते. ते कोरोनामुक्त झाले असून, इतर तीन जणही लवकरच कोरोनामुक्त होतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली. तालुक्याच्या दृष्टीने ही आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे.
- चौकट
सेविकांनी पार पाडली जबाबदारी
बाधितांमध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचाही समावेश होता. त्यामुळे आरोग्य विभाग व दक्षता समितीची मोठी पंचाईत झाली होती. मात्र, सेविकांनी स्वत:ची काळजी घेत फोनवरून व सोशल मीडियामार्फत माहिती पोहोचवत आपली जबाबदारी पार पाडली.
फोटो : १०केआरडी०१
कॅप्शन : येराड-खंडूचा वाडा येथील कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार तहसीलदार योगेश टोम्पे यांच्या हस्ते करण्यात आला.