घंटा वाजली अन् शाळा फुलली!
By admin | Published: June 15, 2017 10:40 PM2017-06-15T22:40:22+5:302017-06-15T22:40:22+5:30
घंटा वाजली अन् शाळा फुलली!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘आई बाबांचा हात धरून, चिमुकली पाय लटूपुटू चालत इवल्याशा डोळ्यातून अश्रू वाहत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रवेशोत्सवाच्या स्वागताने हसू उमलले आणि रुसवा गायब होऊन वर्गात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकाला मिळाली तर शासनातर्फे पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या पुस्तकांची वाटप केली.
शहरातील बहुतांशी शाळा दि. १५ जूनपासून सुरू झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासून नवीन शाळा नवीन वर्गात सोडण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे अण्णासाहेब कल्याणी, सयाजीराव हायस्कूल, कन्या शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा, अनंत इंग्लिश स्कूल याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
शाळेचा पहिला दिवस म्हटला की शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांसाठी आणि मनसोक्त सुटीची आंनद लुटणाऱ्या बालकांसाठी रुसवा, फुगव्याचा आणि रडगाण्याचा दिवस. त्यात आई बाबांचा धाक असतोच. मात्र, यातून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, याकरिता यंदाही दरवर्षीप्रमाणे शाळेच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेच्या पाहिल्या दिवसाच्या प्रवेशोत्सवासाठी शिक्षण विभागातील व अन्य विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाने तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळेमध्ये हजेरी लावत कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आल्याने शाळेचा परिसर स्वच्छ करून शाळेबाहेर रंगीबेरंगी पताका, रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती.
शहरानजीकच्या ग्रामीण भागातही जनजागृती
शहरानजीकच्या ग्रामीण भागातील शाळांनी प्रभात फेरी काढत शिक्षणाविषयी जनजागृती करून आनंद साजरा केला. तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. याचवेळी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यक्रमाचे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.