साताऱ्यात घरासह ऊसतोड मजुरांच्या झोपडीला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By सचिन काकडे | Updated: March 12, 2024 19:16 IST2024-03-12T19:16:24+5:302024-03-12T19:16:47+5:30
सातारा : साताऱ्यातील मतकर कॉलनीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तर साेनगाव कचरा डेपोजवळ असलेल्या ऊसतोड मजुरांची झोपडीही आगीत ...

साताऱ्यात घरासह ऊसतोड मजुरांच्या झोपडीला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
सातारा : साताऱ्यातील मतकर कॉलनीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तर साेनगाव कचरा डेपोजवळ असलेल्या ऊसतोड मजुरांची झोपडीही आगीत खाक झाली. आज, मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनांमध्ये संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मतकर कॉलनीत शांताराम धोत्रे यांचे घर आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या घरातील वस्तूंनी पेट घेतला. काही वेळात अन्य वस्तूही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. पालिकेचे वाहतूक विभाग प्रमुख प्रशांत निकम यांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी हणमंत फडतरे, राम इंगवले, वैभव अडागळे यांनी यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
या घटनेत धाेत्रे यांच्या घरातील पैसे, कपडे तसेच अन्य साहित्य जळाल्याने प्रचंड नुकसान झाले. आगीची दुसरी घटना दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सोनगाव कचरा डेपोजवळ घडली. येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या एका झोपडीला आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. झोपडीला नेमकी कशामुळे आग लागली? याचे कारण समजू शकले नाही.