चक्क घरचं अंगण घेतलं भाडेकरारावर!

By admin | Published: May 25, 2015 10:51 PM2015-05-25T22:51:26+5:302015-05-26T00:54:15+5:30

वृध्द जोडप्याचं हाल : पोलीसदादा म्हणतो, ‘तुम्हाला कोणी सांगितलं फसायला’

The house courtyard took the courtyard! | चक्क घरचं अंगण घेतलं भाडेकरारावर!

चक्क घरचं अंगण घेतलं भाडेकरारावर!

Next

सातारा : भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी महानगरांत गेलेल्या मुलांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून घरचं आंगण पवनचक्की कंपनीला भाडे करारावर देणाऱ्या चंद्रू गालवे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. तीन लाखांची बोली ठरवून दीड वर्षात केवळ पन्नास हजार रुपये देऊन त्यांची बोळवण करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांना पोलिसांचीही साथ मिळत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले आहे. गोकुळ तर्फ पाटण येथील चंद्रू गालवे यांना तीन मुले. त्यांची ही तिन्ही मुलं रोजगाराच्या निमित्ताने महानगरांत स्थायिक आहेत. सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना दोन वर्षांपूर्वी पवनचक्की कंपनीतून काही माणसं भेटायला आली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर अंतिम चर्चेसाठी मुलगा येणार असल्याचे सांगून ती बैठकही झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे गालवे यांना दीड वर्षांपूर्वी कंपनीने पन्नास हजार रुपये रोख दिले. त्यानंतर मात्र कंपनीने आज, उद्या करत वेळ घालविला. तब्बल दीड वर्षे हेलपाटे मारूनही गालवे यांना त्यांची निर्धारित रक्कम मिळाली नाही.मोरगिरी ते गोकुळ हा १२ किलोमीटरचा रस्ता आहे. यातील चार किलोमीटरची पायपीट करून गालवे पाटण स्टॅण्डला पोहोचतात. तेथून एक किलोमीटरवर कंपनीचे आॅफिस तेही पायीच जाणे. या हेलपाट्यांना वैतागून गालवे यांनी अखेर चढ्या आवाजात कंपनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर ‘पुढील सप्ताहात येऊन चेक न्या,’ असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यानुसार त्यांना एप्रिल २०१५ चा चेक दिला. यातही कंपनीने चलाखी केली. ‘चेक हा सुरक्षेच्या कारणास्तव दिला आहे. तो खात्यात भरू नये,’ असा उल्लेख चेकच्या मागे करण्यात आला आहे. त्यामुळे या धनादेशाचा काहीच उपयोग नसल्याचे गालवे यांच्या लक्षात आले. गालवे यांनी पोलिसांत धाव घेतली तर तिथेही त्यांना धक्कादायक वागणूक मिळाली. आपल्याबाबतीत घडलेल्या गोष्टींची माहिती त्यांना दिल्यानंतर ‘तुम्हाला कोणी सांगितलं होतं फसायला’ अशी भाषा पोलिसांनी वापरली. ‘सद्रक्षणाय’ चे ब्रिद छातीवर बाळगणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे गालवे पुरते खचून गेले आहेत. (प्रतिनिधी)

कोणाला सोबत आणायचं नाही.
सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना संधीवाताचा त्रास आहे. घरापासून कंपनीच्या कार्यालयापर्यंत प्रवासात त्यांच्याबरोबर गावातील तरुण जायचे. कंपनीचे अधिकारी गोड बोलून गालवे यांना फसवू लागले की हे तरुण आक्रमकपणे आपले मत मांडायचे. हे कंपनी कर्मचाऱ्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी गालवे यांना ‘तुम्ही एकटे या, सोबत कोणाला आणले तर कार्यालयात घेणार नाही,’ अशी धमकीही दिली.
‘आमच्या गावाकडं शिक्षण आणि नोकरी याची सोय नसल्यामुळे तिन्ही मुलं मुंबईत राहतात. त्यांच्या संसाराला हातभार लागावा आणि अंगणाच्या मोबदल्यात प्रत्येकाला लाख-लाख रुपये मिळावे, या हेतूने मी जागा भाडेकरारावर दिली. डोळे मिटेपर्यंत हे पैसे मिळणार नाहीत, असेच वाटू लागले आहे.’
- चंद्रू गालवे, शेतकरी, गोकुळ तर्फ पाटण

Web Title: The house courtyard took the courtyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.