घरपट्टी थकबाकीदारांच्या इभ्रतीचा भोंगा !

By admin | Published: February 5, 2016 10:56 PM2016-02-05T22:56:23+5:302016-02-06T00:02:58+5:30

पालिकेची अनोखी मोहीम : कर थकविणाऱ्या लोकांची नावे लाउडस्पिकरवर करणार जाहीर

The house-locked bhogga! | घरपट्टी थकबाकीदारांच्या इभ्रतीचा भोंगा !

घरपट्टी थकबाकीदारांच्या इभ्रतीचा भोंगा !

Next

सातारा : वर्षानुवर्ष कायद्याची पळवाट घेऊन पालिकेचा कर थकविणाऱ्या बड्या धेंड्यांची नावे गल्लीबोळात फिरून लाउडस्पीकरवर जाहीर करून त्यांच्या इभ्रतीचा भोंगा वसुली विभाग वाजविणार आहे. पालिकेच्या या अनोख्या मोहिमेमुळे इभ्रतीखातर तरी थकबाकीदार पालिकेत येऊन आपला कर जमा करतील, हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
दरवर्षी मार्च महिना जवळ आल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम सुरू होते. तत्पूर्वी नागरिकांना नोटीस पाठवून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते; मात्र तरीही काहीजण याकडे कानाडोळा करतात. वर्षानुवर्ष थकबाकी वाढत चालली असतानाही मिळकतदार मूग गिळून गप्प बसतात. वसुली पथक दारात आल्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या वरदहस्ताने वसुली पथकावर दबाव आणला जातो, असा नेहमी आरोप होत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकी वाढत जात असते.
शहरात तीन हजारांहून अधिक मिळकतदार आहेत. त्यापैकी सुमारे दीड हजार मिळकतदार, थकबाकीदार आहेत. त्यामध्ये पालिकेच्या शिक्षण मंडळाचाही समावेश आहे. याशिवाय बडे धेंडेही कर बुडवतात, असा पालिका प्रशासनाचा अनुभव आहे.
थकबाकीदारांमध्ये केवळ ओढग्रस्तीचा संसार करणाऱ्या गरिबांचा समावेश नसून तालेवार मंडळीही कर बुडवतात. हे या निमित्ताने जग जाहीर होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
एखाद्या धेंड्याचे नाव लाउडस्पिकरवरून पुकारले गेल्यास, ज्यांच्यापुढे त्याची ऐट चालते त्यांच्यासमोरच त्याच्या इज्जतीचा भाजीपाला होऊ शकतो. त्यानंतर परिसरात आपल्याविषयी नको त्या चर्चा रंगतील, या धास्तीने बडे धेंडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेत रांगा लावतील, असा जाणकारांचा होरा आहे.
ही मोहीम सुरू करण्यापूर्वी संबंधितांना भेटून पालिकेचे कर्मचारी थकबाकी भरण्याचे आवाहन करत आहेत. सध्या पालिकेत घरपट्टी हरकतीसाठी अर्ज येत असल्यामुळे वसुली विभागाचा वेळ त्यामध्येच जास्त आहे. प्रलंबित कामे संपल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम लाऊडस्पिकरसह सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)


यंदा होणार ११ कोटींची वसुली
पालिकेच्या लिस्टवर एकूण २६ कोटींची थकबाकी आहे. मात्र त्यामधील ६ कोटींची थकबाकी सध्यातरी वसूल न होण्यासारखी आहे. कारण संबंधित मिळकतदारांनी न्यायालयात दावे दाखल केले आहेत. २६ कोटींपैकी ९ कोटी २० लाख पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाची थकबाकी आणि चालू वर्षाचा कर, असा मिळून ११ कोटींची वसुली सध्या पालिका करणार आहे.



सध्या मिळकतदारांना थकबाकीसंदर्भात सूचना करत आहे. तरी सुद्धा त्यांनी ऐकले नाही तर येत्या दोन दिवसांत लाउडस्पिकरवर नावे जाहीर करत ही मोहीम सुरू होणार आहे.
- आंबादास वणवे
(वसुली अधीक्षक, सातारा पालिका)

Web Title: The house-locked bhogga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.