सुधन्वाच्या घराला नातेवाइकांचे कडे, चौकशी करणाऱ्यांचीच घेतायत उलट तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:19 PM2018-08-11T13:19:55+5:302018-08-11T14:06:48+5:30
नालासोपारा येथील बॉम्बच्या साठ्याप्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा लपविण्यासाठी सुधन्वाच्या नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती कडे केले आहे. उलट चौकशी करणाऱ्यांचीच ते उलट तपासणी घेत आहेत.
सातारा : नालासोपारा येथील बॉम्बच्या साठ्याप्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा लपविण्यासाठी सुधन्वाच्या नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती कडे केले आहे. उलट चौकशी करणाऱ्यांचीच ते उलट तपासणी घेत आहेत.
एटीएसने वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून साताऱ्यांतील करंजे पेठेमध्ये राहणाऱ्या सुधन्वा गोंधळेकरचे नाव समोर आले. त्यानंतर एटीएसने सुधन्वावर पाळत ठेवून त्याला पुण्यातून अटक केली. बॉम्बच्या साठ्या प्रकरणात गोंधळेकरला अटक झाल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आपल्या सहकाऱ्यासह गोंधळेकरच्या घराकडे धाव घेतली. तसेच गोपनीय विभाग, क्राईम ब्रँचचे अधिकारीही चौकशीसाठी घराकडे धावले. रात्री दहापर्यंत पोलिसांची वर्दळ गोंधळेकरच्या घराजवळ होती.
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी गोंधळेकरचे नातेवाईक घराजवळ ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर बारीक नजर ठेवून होते. कोणी चौकशी करायला आलेच तर कोण पाहिजे, तुम्ही कुठून आलात, काय काम आहे?, अशी समोरच्याची उलट तपासणी घेत आहेत.
बंगल्याच्या खिडक्या पूर्णपणे बंद करून आतून पडदे लावून घेतले होते. जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीला आतील काही दिसू नये, याची त्यांनी खबरदारी घेतली होती. घरासमोर एखादे वाहन उभे राहिले तरी शंकास्पद नजरेने गोंधळेकरचे नातेवाईक पाहत होते. गाडीचा नंबर काय आहे?, याची सर्वकाही माहिती ते घेत होते.
गोंधळेकर कुटुंबावर पोलिसांचे लक्ष..
सुधन्वाला एटीएसने अटक केल्यानंतर सातारा पोलिसांनी सारे लक्ष त्याच्या कुटुंबावर केंद्रित केले आहे. त्याच्या कुटुंबाला कोण-कोण भेटी देत आहे. त्यांच्या संपर्कात कोण-कोण आहे? याची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे. शनिवारी सकाळीही पोलीस सुधन्वाच्या घराजवळ गेले होते.
सुधन्वाचे मित्र आऊट आॅफ कव्हरेज..
सुधन्वाचे मित्र साताऱ्यात बरेच आहेत. त्यांच्याकडून सुधन्वाची आणखी काही माहिती मिळते काय? याची सातारा पोलीस चाचपणी करत आहेत. मात्र, त्याचे मित्र साताऱ्यांतून गायब झाले असून, अनेकांचे मोबाईल आऊट आॅफ कव्हरेज असल्याचे समोर आले आहे.
म्हणे वडिलांना अटकेची माहिती दिली नाही..
सुधन्वावर त्याच्या वडिलांचे अत्यंत प्रेम आहे. सुधन्वा कुठेही असला तरी वडिलांना सांगून जात होता. दोन दिवसांपूर्वी तो साताऱ्यातून पुण्याला जाताना उद्या परत येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, तो अद्याप परत न आल्याने त्याचे वडील त्याची चौकशी करत आहेत. त्याला अटक झाल्याचे अद्याप त्यांना नातेवाइकांनी म्हणे कळू दिले नाही.