साहित्य नसल्याने घरकुलांची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:15+5:302021-05-30T04:30:15+5:30
कऱ्हाड : शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सध्या ठप्प झाली आहेत. बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, दारे, खिडक्या यांची दुकाने ...
कऱ्हाड : शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सध्या ठप्प झाली आहेत. बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, दारे, खिडक्या यांची दुकाने बंद असल्यामुळे घरकुलांची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे कर्ज काढून घरकुल बांधणाऱ्यांची सध्या वाईट अवस्था झाली आहे. त्यांना किमान साहित्य उपलब्ध करून देता यावे, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
दररोज वातावरणात बदल
कऱ्हाड : शहर व तालुक्यात गत आठ दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. सायंकाळी चारनंतर आकाशात ढग जमा होऊन पावसाची चिन्हे निर्माण होत आहेत. सोसाट्याचा वारा, वीज व त्यानंतर जोरदार पाऊस असे वातावरण निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत हवेत गारवा निर्माण होत आहे.
पोलिसांची कारवाई
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कचऱ्याचे ढीग साचले
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
वानरांचा उपद्रव वाढला
तांबवे : किरपे परिसरात वानरांचा उपद्रव वाढला आहे. शिवारातील पिकांवर ते डल्ला मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांवर वानरांनी हल्ला करण्याचेही प्रकार घडले होते. वन विभागाने वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
भाजीपाल्याच्या दरात वाढ
कऱ्हाड : सध्या परिसरात भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी आवक कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. वांगी, वाटाणा, पावटा, दोडका, कारली यांचे दर वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी शहरात येत नाहीत. परिणामी, उपलब्ध भाजीपाल्याची व्यापाऱ्यांकडून मोठ्या किमतीवर विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.
पादचारी मार्ग दुरवस्थेत
कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
धोकादायक वळण
कऱ्हाड : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. या वळणावरून भरधाव वाहनावरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत.