साताऱ्यात घरे, दुकानांची पडझड; वृक्षही उन्मळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:39+5:302021-05-18T04:40:39+5:30
सातारा : एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विसकटली असताना आता ‘तौउते’ वादळाने त्यात आणखी भर टाकली आहे. जिल्ह्यासह सातारा ...
सातारा : एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विसकटली असताना आता ‘तौउते’ वादळाने त्यात आणखी भर टाकली आहे. जिल्ह्यासह सातारा शहरात सलग दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी घरे, दुकानांची पडझड झाली, तर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. ग्रामीण भागातील शेती पिकांचेही या पावसाने मोठे नुकसान झाले.
गेल्या दोन दिवसांपासून तौउते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरशः थैमान घातले आहे. या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही दिसून आला. रविवार व सोमवारी सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. ठिकठिकाणच्या शेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
एकीकडे शेतकरी, दुकानदार, तसेच सर्वसामान्य नागरिक कोरोनामुळे हैराण झाले असतानाच तौउते वादळानेदेखील सर्वसामान्यांना मोठा झटका दिला. सातारा शहरासह पश्चिमेकडील परळी खोऱ्यालाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिक व शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
(चौकट)
भिंत पडल्याने प्रचंड नुकसान
सातारा शहरातील मल्हारपेठ येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एका घराची भिंत पावसामुळे पडली. नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले. येथे राहणारे सतीश कांबळे व त्यांचे कुटुंबीय नवीन घरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे जुन्या घरात त्यांनी थोडेफार साहित्य ठेवले होते, तसेच या घराचा उपयोग ते देवघर म्हणून करीत होते. सोमवारी पहाटे भिंत पडल्यानंतर मोठा आवाज आला. यानंतर ही घटना उघडकीस आली.
(चौकट)
दुकानांचे पत्रे उचकटलेले
पाऊस व वाऱ्यामुळे राजवाडा, तसेच दुर्गा पेठेतील दुकानांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांचे पत्रे वाऱ्याबरोबरच उडून गेले, तर काही दुकानांची पडझड झाली. आधीच कोरोनामुळे रोजीरोटी बंद झाली असताना दुकानदारांना नैसर्गिक संकटांचा सामनादेखील करावा लागत आहे.
(चौकट)
वेगवान वाऱ्यामुळे वृक्षांनीही टाकल्या माना
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सातारा शहरातील ठिकठिकाणचे वृक्ष उन्मळून पडले. अजिंक्यतारा किल्ला, तसेच पोलीस परेड मैदानाच्या बाहेरील वृक्षांनी रस्त्यावरच माना टाकल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलीस कर्मचारी व वाहनधारकांनी रस्त्यावरील वृक्ष बाजूला केले.
(चौकट)
वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज वाहिन्यादेखील तुटल्या, तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने शहरातील बहुतांश ठिकाणचा वीजपुरवठा रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर खंडित झाला होता. वादळी वाऱ्याने महावितरणला मोठा शॉक दिला असून, सोमवारी दिवसभर वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
सर्व फोटो मेल केले आहेत.
(सर्व छाया : जावेद खान)