पावसाच्या गावी घरांना गवताच्या झडपा, घरांच्या भिंतीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; कास परिसरात लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:24 PM2022-05-30T15:24:44+5:302022-05-30T15:30:37+5:30
कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो.
सागर चव्हाण
पेट्री : कास परिसरातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील गावांगावात पारंपरिक पध्दतीने घरांच्या भिंतीचे संरक्षण होण्यासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बहुतांशी गावांतील आवश्यक घरांना झडपी बांधल्या आहेत. पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धूके, जास्त थंडी पाहता घरातील वातावरण उबदार राहण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधून पर्यावरणपुरक उपाययोजना केली जात आहे.
कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. मनुष्य आपलं संरक्षण करतो तसंच गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतो. घरांच्या भिंतीना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधतात. बहुतांशीजणांनी झडप्या बांधून घरांच्या भिंतीला संरक्षणात्मक उपाय केला असून काही ठिकाणी झडप्या बांधण्याचे काम वेगात सुरू आहे.
मुसळधार पावसाच्या पाण्याचा तडाखा ज्या दिशेने बसतो अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधतात. साधारण जूनच्या सुरूवातीस कामाला सुरूवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभी करून मेसाची फोकाटी आडवी-उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवतात विशिष्ट पध्दतीने झडपी बांधतात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतीचे पावसाच्या तडाख्यापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधली जातात. पावसाळयानंतर कुजलेले गवत तरव्याला खत म्हणुन वापरतात.
दुर्गम, डोंगरमाथ्यावर पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसतो. भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत आणण्याचे काम झडपीमुळे होते. घराच्या भिंती पावसाच्या तडाख्याने भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेतकरी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार आपापल्या घरांच्या भिंतींना बांधतात. झडपी बांधण्यासाठी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.