आपण आतून कसे आहोत हे महत्त्वाचे--स्वाती महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:04 PM2017-09-28T22:04:09+5:302017-09-28T22:06:41+5:30
सातारा : ‘आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला का विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे,
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला का विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे,’ अशी अपेक्षा लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी व्यक्त केली.
जकातवाडी, ता. सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद कार्यक्रमात लेफ्टनंट महाडिक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, ‘प्रशिक्षण काळात केस कापल्यामुळे तुम्हाला कसे वाटले, याविषयी मला अनेक विद्यार्थिनींनी प्रश्न विचारला. आपण कसे दिसतो, याहीपेक्षा आपण कोणते कार्यकर्तृत्व सिद्ध करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. सामाजिक कार्यकर्ती, शिक्षिका ते लेफ्टनंट या प्रवासात मला माझ्यातील अनेक नवे पैलू अनुभवायला आणि पाहायला मिळाले. जिद्दी आणि वेगळं करून दाखवण्याची धमक या दोन गोष्टीच भविष्यात उपयोगाला येणार आहेत.’लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची मुलाखत किशोर काळोखे यांनी घेतली. यावेळी लक्ष्मण माने, भाई माने, समजा जीवन आदी मान्यवर उपस्थित होते.
आई आपणच घरीच राहू
कर्नल संतोष महाडिक यांना वीर मरण आले तेव्हा स्वराज अगदीच न कळत्या वयाचा होता. त्यामुळे त्याला त्याचे वडील पूर्णपणे आठवत नाहीत. पण सैन्याच्या प्रशिक्षणासाठी मी त्याच्यापासून दीड वर्ष लांब राहिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता मी घरी आले आहे.
पण स्वराजला घर सोडून कुठेही बाहेर जायला नको वाटते. ‘आई आता कुठेही फिरायला जायचं नाही, आपण आपल्या घरातच राहायचं’ त्याचं हे वाक्य त्याच्या आयुष्यातील आमची कमी अधोरेखित करत असल्याचे भावनिक होऊन लेफ्टनंट महाडिक यांनी सांगितले.