आरोग्य केंद्रात ‘कितने आदमी थे?.. सिर्फ दो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:14 PM2017-07-28T23:14:23+5:302017-07-28T23:16:57+5:30
अनेक आक्षेपार्ह बाबी उघडकीस; वरिष्ठ अधिकारी करणार चौकशी
सातारा : ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु सातारा जिल्ह्यातील तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पुरवली जात नाही. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी शुक्रवारी दुपारी इथल्या कारभाराचा पंंचनामा केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोयना जलाशयनजीक जावळी तालुक्यात अतिदुर्गम तळदेव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रातील कामकाजाविषयी अनेक तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयासह आठ इतर आरोग्य कर्मचारी आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत, राजकीय पाठबळ असल्याने आरोग्याबाबत काम करीत नाहीत. वरिष्ठ अधिकारी यांना नोंदवही, लॉग बुक दाखवले जात नाही. पाण्याचे नमुने घेत नाहीत. अर्ज न देता कर्मचारी गैरहजर राहतात. फार्मासिस्ट नसला तर शिपाई औषध देतात, अशा तक्रारी होत्या.
त्यानुसार वसंतराव मानकुमरे यांनी येथे भेट देऊन अनेक बाबी उघडकीस आणल्या. त्यांनी तत्काळ येथील अधिकारी व कर्मचाºयांचे जाब जबाब नोंदविले. दरम्यान, यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज शिकलगार यांच्या व्यतिरिक्त केवळ एक शिपाई आणि एक महिला अधिकारी दवाखान्यात उपस्थित होते. कनिष्ठ सहायक गैरहजर, फार्मासिस्ट दुपारी साडेतीननंतर बाहेर गेलेले. केवळ मस्टरवर सह्या करण्यासाठी काही कर्मचारी हजर राहतात.
ही बाब स्पष्ट झाल्यानंतर. याप्रकरणी रीतसर अहवाल तयार केला आहे. स्वत: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या भागात अनेक सुविधा येतात; पण स्थानिक काही लोकप्रतिनिधी त्याचा वापर आपली संपत्ती वाढविण्यासाठी करतात, असा आरोप मानकुमरे यांनी यावेळी केला.
कुटुंब कल्याणचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. पाणी नमुने घेतले जात नाहीत, दवाखान्याची वेळ २४ तासांची असताना ग्रामस्थांना सेवा पुरविली जात नाही. फार्मासिस्ट नसताना एएनएम गोळ्या देतात. वैद्यकीय अधिकारी ओपीडीत हजर नसतात, अशा बाबी पंचनाम्यात केल्या आहेत.
येथील आरोग्य सुविधा सुधारण्याची अशा ग्रामस्थांनी सोडली आहे. त्यामुळे या स्ट्रिंग आॅपरेशनची चर्चा होते की प्रश्न सुटेल? याकडे लक्ष लागले आहे. यावेळी अधिकारी दिलीप शिंदे, डॉ. शिकलगार, धोंडिबा जंगम, नारायण जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते.
...तर १५ आॅगस्टला टाळे ठोकणार..
या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आली. मात्र, संपूर्ण इमारत गळत आहे. वैद्यकीय अधिकाºयांचे कर्मचाºयांवर नियंत्रण नाही. स्वाई फ्ल्यूबाबत तत्काळ कारवाई करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही अधिकारी ग्रामसभेला उपस्थित राहत नाही. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यापुढे रुग्णालयाच्या अनुषंगाने असणाºया अनेक अडचणी मांडल्या. १५ आॅगस्टपर्यंत रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ बदलण्यात यावा तसेच या दूर झाल्या नाहीत तर १५ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा तळदेव व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
आरोग्याबाबत गलथान कारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. तळदेव आरोग्य केंद्राबाबतीत अनेक तक्रारी होत्या. प्रत्यक्षभेटीनंतर तर संतापजनक बाबी पुढे आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
- वसंतराव मानकुमरे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद