किती ही लूट; बाजार समितीत कांदा १५ तर घराजवळ ३० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:13+5:302021-07-31T04:38:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांना दर जेमतेम मिळत असला तरी मंडई, दुकानात जादा दर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांना दर जेमतेम मिळत असला तरी मंडई, दुकानात जादा दर आकारला जातो. साताऱ्यात तर बाजार समितीत १० ते १५ किलोने मिळणारा कांदा घराजवळच्या दुकानात ३० रुपये किलोने दिला जात आहे. तसेच मेथी, शेपूच्या पेंडीमागे ५ ते १० रुपये जादा घेतले जातात.
सातारा शहरातील विविध भागात चार मंडई आहेत. तसेच फुटपाथ आणि दुकानांतून भाज्यांची विक्री होते. याठिकाणी बहुतांश शेतमाल हा सातारा बाजार समितीतून खरेदी करुन विक्रीसाठी आणलेला असतो. तसेच काही शेतकरी स्वत: रस्त्यावर उभे राहून भाजीपाला विकतात. बाजार समितीत शेतमालाचा भाव कमी निघतो. पण, भाजी मंडई आणि दुकानांतून भाज्यांमागे जादा दर आकारला जातो. त्यामुळे किरकोळ विक्रेते हे भाज्यांमागे किलोला १० ते २० रुपये जादा घेतात. सध्या बाजार समितीत कांद्याला ५ ते २० रुपये दर मिळतो. पण, किरकोळ विक्रेते हा चांगला कांदा ३० रुपये किलोपर्यंत विकतात. तसेच इतर भाज्यांचे दरही वाढवले जात असल्याचे दिसते.
..........
मंडईत कांदा २५ तर दुकानात ३० रुपये किलो...
मंडईत येणाऱ्या ग्राहकांची संख्या जादा असते. त्यातच विक्रेते हे मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करुन मंडईत ठेवतात. त्यामुळे एकदम कांदा घेतल्याने त्यांना बऱ्यापैकी स्वस्त मिळतो. त्यामुळे मंडईत चांगला कांदा २५ रुपयांना किलो मिळतो तर छोट्या दुकानात त्यासाठी ३० रुपये घेतले जातात.
..........................
पिकवतात शेतकरी, अधिकचा पैसा तिसऱ्याच्याच हातात...
- शेतकरी भाजीपाला पिकवतात. त्यानंतर वाहनांतून हा शेतमाल बाजारात आणला जातो. याठिकाणी जेमतेमच पैसेच त्यांच्या हातात पडतात.
- कधी-कधी दर पडल्यास वाहतूक खर्चही निघत नाही. पण, बाजार समितीतून हा भाजीपाला दुकानदार, विक्रेते घेऊन जातात व वाढीव दराने विकतात.
- किरकोळ दुकानदार आणि मंडईतील विक्रेते गिऱ्हाईकांना अधिक किंमत सांगून नंतर थोडा दर कमी करुन भाजीपाला विकतात. पण, भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नसते.
....................................
हा बघा, दरातील फरक (प्रतिकिलो दर)
बाजार समिती दुकानात
कांदा १० ते २० ३०
वांगी ३० ६०
टोमॅटो ८ ते १० २०
कोबी ६ ते ७ २०
गवार ३० ८०
कारली ३० ६०
दोडका ३० ६०
फ्लॉवर ४० ६०
वाटाणा ६० १००
शेवगा शेंग ४० ८०
....................................................
पाव, अर्धा किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही...
बाजार समितीत घाऊक स्वरुपात भाजीपाला मिळतो. पण, नेहमीच ताजी भाजी खाण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पाव किंवा अर्धा किलो भाजीसाठी घाऊक बाजाराच्या ठिकाणी जाता येत नाही.
- शांताराम काळे, ग्राहक
.........................
आवश्यकता वाटेल तेव्हा भाजी विकत घेण्यात येते. त्यामुळे जवळच्या दुकानातून किंवा मंडईतून ती आणली जाते. त्यामुळे घाऊकपेक्षा अधिक दर द्यावा लागतो.
- राधा पवार, गृहिणी
......................................................
एवढा फरक कसा ?
बाजार समितीतून तसेच तेथीलच जवळपास विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला दररोज आणला जातो. त्यामुळे वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांकडून चार-पाच रुपये किलोमागे जादा घ्यावे लागतात तरच दुकान चालणार आहे.
- रामचंद्र पाटील, दुकानदार
.......
दररोज बाजार समितीतून भाज्या आणतो. दुकानात भाज्या ठेवल्यावर गिऱ्हाईक सगळा माल नेत नसते. काही भाज्या खराब होतात. त्याचाही विचार करुन परवडेल अशा पद्धतीने भाज्यांची विक्री होते.
- आनंद काळे, दुकानदार
.........................................................