लॉकडाऊनमुळे पावसाळ्यातील धान्यसाठा कसा भरायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:40+5:302021-05-31T04:28:40+5:30
बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी ...
बामणोली : जिल्ह्यातील पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना तसेच नदीपलीकडील अनेक गावच्या लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. अशावेळी येथील लोक मे महिन्यातच चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा करून ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने हे काम थांबले आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने अतिपावसाचे असतात. मान्सून पाऊस सुरू झाला की दळणवळण व संपर्क यंत्रणा ठप्प होतात. जावली तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत. गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावांतील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. याठिकाणचे लोक साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रकमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. परंतु यावर्षी कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठच बंद आहे. त्यामुळे अन्नधान्य साठा कसा करायचा, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पावसाळ्यात सलग चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो. पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे नागरिक प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही.उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. परिसरातील लोकांना पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या डोंगरातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचाही आस्वाद ग्रामस्थ मनसोक्त घेतात.
चौकट
पोटमाळ्यावर जनावरांची वैरण अन् सरपण
तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात. स्वयंपाकासाठी याचा उपयोग होतो, अशी माहिती लामज येथील शिवराम चव्हाण यांनी दिली.
कोट
तळदेव मायणी गाव ठोसेघर पठारापलीकडे दुर्गम ठिकाणी वसले आहे. पावसाळ्याचा धान्यसाठा ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून नेऊन आपल्या घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी अशीच कसरत करावी लागते. पावसाळ्यात कोण आजारी पडले तर गावकऱ्यांना डोली बनवून डोक्यावरून ठोसेघर पठारापर्यंत धुकके-वादळ- पावसातून न्यावे लागते.
- पांडुरंग पवार, ग्रामस्थ, तळदेव मायणी.