धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

By admin | Published: August 30, 2015 09:55 PM2015-08-30T21:55:18+5:302015-08-30T21:55:18+5:30

चंद्रकांत पाटील : पिंपोडे बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आघाडी सरकारवर घणाघात

How to take care of farmers holding partial demerits? | धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

धरणे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे?

Next

वाठारस्टेशन : ‘आघाडी सरकारच्या कृतिशून्य कारभारामुळे सध्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही धरणांची कामे अर्धवट ठेवणारे शेतकऱ्यांचे कैवारी कसे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत कुठलाही स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी मिळावी, असे म्हणणार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन स्वत:च्या पायावर उभे करू.’ असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील वसना नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे जलपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, रा. स्व. संघांचे जिल्हा संघटक डॉ. सुभाष बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हा साखर कारखान्यांचा गुलाम होता; पण युती शासन सत्तेवर येताच १९९५ मध्ये शेतकऱ्याच्या पायातील बेडी काढून साखर उद्योगावरील झोनबंदी उठवण्याचा धाडसी निर्णय युती शासनाने घेतला. चालूवर्षी उद्योग अडचणीत आल्यानंतर ८७० कोटींचा साखर कारखान्यांचा खरेदीकर माफ केला. केंद्र सरकारचे ४ हजार व राज्य सरकारचे १ हजार असे ५ हजार कोटींचे अनुदान प्रतिटन निर्यातीसाठी दिले. ६५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लावून कायमस्वरूपी अपंग करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी, असे वाटणार नाही. यासाठी २५ हजार कोटींची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. यातील साडेसतरा हजार कोटी हे सोलर कृषिपंपासाठी खर्च करणार आहोत.’
जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्वीच्या कामांची दुरुस्ती केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत दर्जेदार कामे साकारता येतील, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, डॉ. अविनाश पोळ, माजी सरपंच विकास साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
विजयराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाळासाहेब
दामले, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, छत्रपती संभाजी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, राजेश निकम, लालासाहेब निकम, सूर्यकांत निकम, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)


पाच वर्षांत ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट
‘चालूवर्षी राज्यातील साडेसहा हजार गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली. यात सातारा जिल्ह्यातील २१५ गावांचा समावेश आहे. ३,१०२ कामांपैकी यंदा २००० कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यात ३० हजार गावे जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवले असून, एकही गाव ‘जलयुक्त’मधून वंचित राहणार नाही,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले ‘शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध होईल. तसेच वीजबिलाचा प्रश्नही राहणार नाही. हे सोलर पंप कमी व्याजदरात व ६० टक्के राज्यशासन अनुदानावर वितरित करणार आहे. यामुळे आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी न देता स्वाभिमानी बनविण्याचे काम आगामी पाच वर्षांत करणार आहोत.’

Web Title: How to take care of farmers holding partial demerits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.