अण्णांबद्दल उमातार्इंना सांगायचे कसे?

By admin | Published: February 23, 2015 12:43 AM2015-02-23T00:43:58+5:302015-02-23T00:46:39+5:30

पानसरे कुटुंबीयांसमोर प्रश्न : नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रीघ

How to tell him about him? | अण्णांबद्दल उमातार्इंना सांगायचे कसे?

अण्णांबद्दल उमातार्इंना सांगायचे कसे?

Next

कोल्हापूर : पानसरे अण्णांना आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या उमातार्इंना अण्णा आपल्यातून निघून गेल्याचे सांगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. भ्याड हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त तूर्त, तरी न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रविवारी रीघ लागली होती.गेल्या बारा वर्षांपूर्वी अवी पानसरे यांचे अचानक निधन झाले. त्या धक्क्यातून उमाताई लवकर सावरल्या नव्हत्या. त्यानंतर अण्णा त्यांना बाहेरील कार्यक्रम, अन्य ठिकाणी जाताना कायम समवेत घ्यायचे. आंदोलने, वकिली आदी स्वरूपातील दैनंदिन कामे उरकल्यानंतर ते अधिकतर वेळ उमातार्इंसाठी देत होते. त्या दोघांचा एकमेकांना मोठा आधार होता. शिवाय त्यांच्यातील भावनिक बंध अतूट होते.भ्याड हल्ल्यानंतर या दोघांवर तातडीने उपचार झाले. त्यातून उमातार्इंच्या प्रकृती दिवसागणिक सुधारत आहे. त्या बोलत आहेत. अशा स्थितीत त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितल्यास त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि उमातार्इंची प्रकृती सुधारावी याची दक्षता म्हणून कुटुंबीयांनी अण्णांच्या निधनाचे वृत्त त्यांना न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रकृती सुधारल्यानंतर देखील त्यांना हे वृत्त कसे सांगायचे, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासह उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशीसाठी रविवारी दिवसभर नातेवाईक, कार्यकर्ते रुग्णालयात, त्यांच्या निवासस्थानी येत होते. त्यात पानसरे यांच्या जन्मगाव कोल्हार, रहाटा, अहमदनगर, नेवासे, नाशिक आदी ठिकाणांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)

मेघा पानसरेंवर जबाबदारी...
अण्णांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. त्याबद्दल्यात दररोज खाव्या लागणाऱ्या गोळ्या अण्णांना आवडत नव्हत्या. गोळ्या खाऊन जगायचे त्यांना रूचत नव्हते. पण, अवी यांच्या निधनामुळे सून मेघा आणि नातू कबीर व मल्हार यांना सांभाळणे, त्यांना बळ देण्याची जबाबदारी असल्याने गोळ्या खाऊन ते तब्येत सांभाळून होते. मुलगा गेल्यानंतरही ते खचून न जाता ठामपणे उभे राहिले. आता अण्णांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी मेघा पानसरे यांच्यावर पडली आहे.


अधिवेशनाचे काय?
उमातार्इंची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. त्या बोलत आहेत. दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या कन्या मेघा व स्मिता तसेच स्नुषा मेघा यांनाच भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी सोडण्यात येते. बाबांची तब्येत सुधारत असल्याचे त्यांना सांगण्यात येते. उमातार्इंनी शनिवारी तोंडावाटे ज्यूस घेतला शिवाय त्यांनी पक्षाचे अधिवेशन आहे ना? हे दवाखान्यात आहेत मग, अधिवेशनाचे काय झाले? असे मेघा व स्मिता यांच्याकडे विचारणा केली.

कार्यालयात नीरव शांतता...
कामगार, मोलकरणी, अंगणवाडी सेविका अशा कष्टकरी, सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठीचा लढा, आंदोलनांचा निर्णय घेणे, चर्चासत्र, अधिवेशनाचे नियोजन आदींची धांदल सुरू असलेल्या बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रविवारी नीरव शांतता होती. ‘लढेंगे, जितेंगे! कॉ. गोविंद पानसरे को लाल सलाम. पानसरे मरे नहीं! पानसरे मरते नहीं! अण्णा हा लढा थांबणार नाही!’ हा नोटीस फलकावरील मजकूर नजरेत साठवून ‘कॉम्रेड रडायचं नाही, लढायचं’ असा निर्धार आणि हुंदका आवरून कार्यकर्ते हे कार्यालयातील अण्णांच्या खुर्चीचे दर्शन घेऊन बाहेर पडत होते.

Web Title: How to tell him about him?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.