‘नियोजन’मधील हुकमाचे पत्ते आज होणार ओपन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:00 AM2017-08-09T00:00:17+5:302017-08-09T00:00:17+5:30

Hukam addresses in 'planning' will be open today! | ‘नियोजन’मधील हुकमाचे पत्ते आज होणार ओपन!

‘नियोजन’मधील हुकमाचे पत्ते आज होणार ओपन!

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नियोजन समितीच्या निवडणुकीतील हुकमाचे पत्ते कोण-कोण हे आज ओपन होणार आहे. बुधवारी सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.
निवडणुकीची मत मोजणी नियोजन समितीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी, दि. 0९ रोजी होणार आहे. या मतमोजणीची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली असून, निवडणुकीतील ४२ उमेदवारांचे भवितव्य मतोजणीनंतर उलगडणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या ४0 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित २९ जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद मतदारसंघातील ६४ पैकी ६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नगरपंचायतीच्या १३६ मतदारांपैकी १३५ मतदारांनी मतदान केले. नगरपालिका मतदारसंघात १९0 मतदारांपैकी १८८ मतदारांनी मतदान केले होते.
मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी या पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आणल्या जातील. नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद मतदारसंघाचे निवडणूक मतमोजणी स्वतंत्ररित्या केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलावर तहसीलदार, नायब तहसीलदार व एक कर्मचारी अशा तिघांची नेमणूक करण्यात आली आहे.
बुधवारी, सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुरुवातीला नगरपंचायतीची त्यानंतर नगरपालिकेची व शेवटी जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिली.
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी सुरुवातीपासूनच रणनीती आखली होती. जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांमध्ये मोठे संख्याबळ असणाºया राष्ट्रवादीलाही इतर सहकाºयांची गरज काही जागांसाठी होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु विरोधकांची जागांची मागणी अवास्तव असल्याने राष्ट्रवादीने ज्यादा जागा देण्याबाबत नकार दिला होता. काँगे्रसने दोन तर भाजपने एक जागा बिनविरोध करुन आपले हित साध्य केले. परंतु राष्ट्रवादीने मात्र ही बोलणी करत असताना पक्षाच्या आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या.
राष्ट्रवादीने काँगे्रससोबत बोलणी चालू ठेवली होती. पण ही बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादीने थेट भाजपशी घरोबा करुन जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण टाकल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नवीन समीकरणाचे गणित आज सुटेल
राष्ट्रवादी व भाजप या दोन पक्षातील सोयरिक कितपत जुळलीय, हे बुधवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या दोन पक्षांनी मांडलेल्या गणिताचे उत्तर बुधवारी निकालानंतर सुटणार आहे. नेत्यांच्या आदेशानुसार मतदान झाले की आपल्या सोयीनुसार मतदारांनी मतदान केले, हे बुधवारी स्पष्ट होईल. सातारा विकास आघाडी, शिवसेना व काँगे्रस यांची मोट कितपत यशस्वी झालीय, हेही पुढे येणार आहे. या नवीन समीकरणांमुळे अनेक जण नाराज झाले आहेत. काही जणांनी तर निष्ठेलाही तिलांजली दिली आहे. कोण कुठे फुटले, याची कारणेही निकालानंतर नेतेमंडळी शोधू लागतील. आपल्या नियोजनानुसारच मतदान झाले आहे का? याची खातरजमा नेतेमंडळींकडून मंगळवारी सुरु होती.
बळीचा बकरा कोण?
सर्वच पक्षांतील सोयरिकीच्या राजकारणामुळे ‘बळीचा बकरा’ कोण ठरणार?, हेही निकालानंतर यथावकाश समोर येईल. काहींचे ‘बीपी हाय’ तर काहींचे ‘लो’ झाले आहेत. निवडणूक लागल्यानंतर गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून फिरणाºया उमेदवारांना कितपत यश आलेय, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. आपला केवळ वापर झालाय, याचा साक्षात्कारही काहींना येऊ लागलाय.
धक्कादायक निकालांची चर्चा
जिल्हा परिषद मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात केवळ ६४ मतदान असल्याने नात्यांचे गणितही मांडले गेलेय. आपल्या विरोधकांचे कायमचे नाक ठेचायचे, या इर्ष्येने काही जण पेटून उठले होते. तर काही लोकांना सोयीस्करपणे जागा देऊन आगामी विधानसभा निवडणुकीची गणितेही आमदारांनी सोडवली आहेत. तर काही आमदारांनी आपल्या वाटेतील काटे दूर करण्याचेही राजकारण खेळले असून धक्कादायक निकाल लागतील, अशी चर्चा सुरु आहे.

Web Title: Hukam addresses in 'planning' will be open today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.