एकोणपन्नास किलोमीटरचा रस्ता झाला प्रदूषणमुक्त
By admin | Published: March 30, 2015 10:46 PM2015-03-30T22:46:56+5:302015-03-31T00:20:03+5:30
धर्माधिकारी प्रतिष्ठान : महाबळेश्वर तालुक्यात गोळा केला सात टन कचरा
महाबळेश्वर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २९ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी सदस्यांनी सुमारे सात टन कचरा गोळा केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केलेले समाजसेवक निरुपणकार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्याचे काम चालू आहे. तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतींमध्ये श्रीसदस्य गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात घावरी, ऐरणे, सांजवड, पार, बिरवाडी, दुधगाव, बिरमणी, कुंभरोशी, नावली, चिखली या दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. या अभियानात ३५८ श्रीसदस्यांनी ४९ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांची साफसफाई केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, समाज मंदिरे व इतर गावांतील ठिकठिकाणचा एकूण २१,१९५ चौ. मी. परिसर साफसफाई करण्यात आला. या अभियानात सुकाकचरा हा ४,९४० व ओला कचरा २,०८१ किलो काढण्यात आला. (प्रतिनिधी)