‘शंभर’चा बाजार उठला; ‘दहा-वीस’ची मात्र चलती !

By admin | Published: November 13, 2016 11:30 PM2016-11-13T23:30:12+5:302016-11-13T23:30:12+5:30

आठवडा बाजारात ‘चलती का नाम नोट’ : कोऱ्या करकरीत पाचशे-हजारांच्या नोटा सोडून काहीही बोला; जुन्या-मळक्या नोटाचांही भाव वधारला

'Hundred' market rises; 'Ten-Twenty-Five' moves! | ‘शंभर’चा बाजार उठला; ‘दहा-वीस’ची मात्र चलती !

‘शंभर’चा बाजार उठला; ‘दहा-वीस’ची मात्र चलती !

Next

सातारा : ‘ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या...’, ‘आमच्याकडनं कोण घेत नाही बघा...’, असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही. आणखी काही दिवस नवे पैसे मिळाले नाही तर अडचण नको म्हणून सातारकर खिशात असूनही शंभरची नोट मोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शंभरच्या नोटेचा बाजार उठला आहे. दहा वीसच्या नोटांची चलती दिसत आहे. मळकी, फाटकी नोट असली तरी द्या; पण पाचशे, हजारांची नको. असे शेतकरी म्हणत आहेत.
चलनातून पाचशे अन् हजारांच्या नोटा मंगळवारी रात्रीपासून अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अर्थकारणावर जबर फटका बसला आहे. पहिल्या दोन-तीन दिवसांत तर अनेकांना चहा, नास्टा करण्यासाठीही अवघड झाले होते. या घटनेला पाच-सहा दिवस झाले तरी अजून फारशी परिस्थितीत बदललेली नाही. पण यातून सातारकर मात्र सावरत आहेत.
जुना मोटार स्टॅण्ड परिसरात रविवारच्या बाजारात थेट शेतकरीच माल विकण्यासाठी येतात. त्यातच शाळा-महाविद्यालय, नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या बाजारात दर रविवारी तुफान गर्दी असते. ऐतिहासिक निर्णयानंतर रविवारी प्रथमच आठवडा बाजार भरला होता. दरवेळीसारखी गर्दीच यंदा दिसत नव्हती. सर्वत्र तुरळक ग्राहक दिसत होते. (प्रतिनिधी)
किरकोळ नोटा
आल्या बाहेर..
पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर कसं होईल?, असं वाटलं जात होतं. याचा फटका आठवडा बाजाराला बसलाही. पण जे ग्राहक आले त्यातील बहुतांश जणांकडे दहा, वीस, पन्नासच्या नोटा पाहावयास मिळत होत्या.
चाळीसची
वस्तू वीसला...
शेतकऱ्यांनाही आणलेला माल विकायचा होता. त्यातच ग्राहकांची संख्या रोडावलेली. त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती कमी होत्या. परंतु हुशार ग्राहक त्यातूनही किमती पाडून मागत होते. अशा वेळी ग्राहक सोडण्यापेक्षा ‘चला घ्या...’ म्हणून माल दिला जात होता.
‘कांदा-बटाटा’वाल्यांकडे पाचशे चालते..
कांदा-बटाटे विक्री करणारे व्यापारीच अधून-मधून एखादा ग्राहक पाचशेची नोट दिली तर ते घेत होते. ग्राहकांनी पाचशेची नोट आहे, असे सांगितले असता पहिला प्रश्न विचारला जायचा. ‘किती घेणार?’ मोठा ग्राहक असला तर हे व्यापारी पाचशेची नोट घेत होते. कोणी काही विचारलंच तर कष्टाचा पैसा हाय? त्याला काय घाबरायचं. बँकेत जमा करू की, असे सांगितले जात होते.
 

Web Title: 'Hundred' market rises; 'Ten-Twenty-Five' moves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.