उपलब्ध शंभर... मागणी मात्र हजारांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:01+5:302021-05-20T04:42:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ऑक्सिजन मशीनचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत ...

Hundreds available ... but demand in the thousands! | उपलब्ध शंभर... मागणी मात्र हजारांवर !

उपलब्ध शंभर... मागणी मात्र हजारांवर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ऑक्सिजन मशीनचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन शोधून-शोधून दमलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना आता ऑक्सिजन मशीनच्या शोधासाठी धावावे लागत आहे. अवघ्या शंभरभर उपलब्ध असलेल्या या मशीन्स मिळविण्यासाठी नातेवाइकांना पुन्हा एकदा द्राविडी प्राणायाम करावे लागत आहेत.

कोविडमुक्त झालेल्या काही रुग्णांना नंतरही काही दिवस श्वसनाचा त्रास जाणवतो. फुप्फुसांत झालेल्या संसर्गाबरोबरच औषधांच्या वापराचा परिणाम म्हणून रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी रुग्णांच्या फुप्फुसावर ताण न देता त्यांना मशीनद्वारे ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला जातो. साताऱ्यात सुमारे शंभर ऑक्सिजन मशीन उपलब्ध आहेत. त्यांतील काही मशीन जम्बो कोविड सेंटरबाहेर प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना लावल्या जातात. उपलब्ध असलेल्या मशीन विनामोबदला पुरविण्यासाठी वात्सल्य फौंडेशन आणि खिदमत ए खलक या संस्था कार्यरत आहेत. कोविडमुक्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे दिवसभरात शेकडो फोन केवळ मशीन उपलब्ध करून देण्यासाठी येऊ लागले आहेत.

ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन मशीनचा वापर करण्याचा सल्ला दिला गेल्याने ते आणणे क्रमप्राप्त असते. लिहून दिल्यानंतरही मशीन नाही उपलब्ध करून दिले तर रुग्णाला त्याच्या आरोग्याकडे कुटुंबीय दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण होते. विशेष म्हणजे पूर्वी दिवसावर या मशीनचा दर आकारला जायचा; तो आता तो तासांवर आला आहे. अनेकांनी घरी जाऊन ही सेवा सशुल्क पुरविण्याचाही घाट घातला आहे. रेमडेसिविरनंतर आता या मशीनचाही काळाबाजार होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी आवश्यक तेवढ्याच रुग्णांना मशीनचा सल्ला देणे आवश्यक आहे.

चौकट..

शंभर मशीनवर हजारो रुग्णांची भिस्त !

रक्तदाब, मधुमेह, किडनी यांसह फुप्फुसांमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांना कोविडमुक्त झाल्यानंतरही ऑक्सिजन मशीन आवश्यक असते. कोरोनावर मात करताना काहींना फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल तर फुप्फुसाला बरे होण्याचा अवधी देऊन ते काम कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन मशीन करते. कोरोनावर मात करणाऱ्या अवघ्या २० टक्के रुग्णांना याची गरज भासत असताना जिल्ह्यातील जवळपास सर्वच रुग्णांना ऑक्सिजन मशीनचा वापर करण्याचा सल्ला लिहून दिला जात असल्याने नातेवाइकांना यासाठी पुन्हा एकदा धावपळ करावी लागत आहे.

कोट :

वात्सल्य फौंडेशनकडे सध्या ४२ मशीन उपलब्ध आहेत. याबरोबरच खिदमत ए खलक आणि अन्य काही सेवाभावी संस्थांकडे मिळून सुमारे शंभर ऑक्सिजन मशीन उपलब्ध आहेत; पण बऱ्या झालेल्या प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन मशीन लावण्याचा सल्ला दिला जात असल्याने मशीनच्या मागणीसाठी दिवसाला शंभरहून अधिक कॉल येतात.

- शशिकांत पवार, वात्सल्य फौंडेशन, सातारा

Web Title: Hundreds available ... but demand in the thousands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.