शंभर बेडवर हजाराच्या रुग्णांचा भार ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:37+5:302021-05-19T04:40:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्रतेने जाणवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे. आजवर तालुक्यात एकूण ८५५७ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी हजारावर रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. मात्र, कोरोना उपचारासाठी शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये केवळ शंभर बेडची सुविधा असल्याने त्यावर हजारो रुग्णांचा भार येत आहे.
तालुक्यात सध्या हजाराहून अधिक रुग्ण आहेत. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि जगताप हॉस्पिटल या सरकारी नियंगणातील सेंटरमध्ये केवळ शंभर बेडची व्यवस्था आहे. ग्रामीण रुग्णालयात ३० बेडपैकी १६ ऑक्सिजन बेड, तर जगताप हॉस्पिटलमध्ये ७५ बेडपैकी ६० ऑक्सिजन बेड आहेत. आयसीयू अथवा व्हेंटिलेटर सुविधा एकही नाही. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक गावांनी स्वखर्चातून विलगीकरण कक्ष तयार करून यापैकी बहुतांश रुग्णांना विलगीकरणात ठेवले आहे.
तालुक्यात खाजगी रुग्णालयासह केवळ २८५ बेडची व्यवस्था आहे. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर बेडसाठी खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या सर्व मिळून १६९ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ७० बेड सरकारी आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य लोकांना शक्य नसल्यामुळे सरकारी कोविड केअर सेंटरची बेड संख्या वाढविणे, तसेच तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करणे गरजेचे आहे.
तालुक्यात बेडची संख्या अपुरी असल्यामुळे सातारा, वाई, तसेच उपलब्धतेनुसार पुणे या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. मात्र, या ठिकाणी बेड मिळविणे सर्वसामान्य लोकांच्या कुवतीबाहेर आहे.
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता अनेकांना बेड उपलब्ध होत नाही. कोरोना उपचारासाठी सामान्यांची परवड होत आहे. तरीही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व स्टाफ अहोरात्र काम करीत आहे. लोकांची कोरोना चाचणी करणे, बाधितांना उपचारासाठी दाखल करणे, लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना देखरेखीखाली ठेवणे, उर्वरित लोकांचे लसीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणा झटत आहे.
चौकट
खाजगी उपचार महागाचे
खंडाळा तालुक्यात खाजगी रुग्णालयांत सुमारे १८० बेड आहेत, यापैकी १०० ऑक्सिजन बेड व काही आयसीयू आहेत. मात्र, येथे उपचार घेण्यासाठी ५० हजार ते तीन लाखांपर्यंत रक्कम भरावी लागत आहे. पेशंटचा कोविड स्कोअर किती आहे त्यानुसार त्या बेडची रक्कम ठरविली जात आहे. विशेष म्हणजे एवढे पैसे भरायची तयारी असणाऱ्या रुग्णांचा स्कोअर जर जास्त असेल तर त्यांनाही खासगीचे दरवाजे बंद केले जातात. यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे खाजगीत उपचार घेताना कंबरडे मोडत आहे.