पर्यंती येथील शंभर ब्रासचा वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:57+5:302021-07-28T04:40:57+5:30
म्हसवड : भर दुपारच्या वेळी लोक आपापल्या कामात गुंतले असतानाच तालुक्याच्या दुर्गम भागात प्रांताधिकारी घुसले. कुणाला काही कळायच्या ...
म्हसवड : भर दुपारच्या वेळी लोक आपापल्या कामात गुंतले असतानाच तालुक्याच्या दुर्गम भागात प्रांताधिकारी घुसले. कुणाला काही कळायच्या आतच चोरीच्या वाळूवर छापा टाकला. तब्बल १०१ ब्रास वाळूचा ढीग पर्यंती (ता. माण) येथील महादेवनगर टिंबर मळ्यात जप्त केला. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
काळ्या सोन्याची चोरी करण्यासाठी जिल्हा, परजिल्ह्यातील अनेक जण सक्रिय आहेत. प्रशासनाने कितीही अंकुश ठेवायचा प्रयत्न केला तरी तालुक्यातून वाळू दिवसाढवळ्या गायब होण्याचे प्रकार घडतात. त्यातच दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन उपाययोजना करण्यात गुंतल्याचे पाहून अनेकांनी वाळूचा चांगलाच बाजार केला.
तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. यातून उसंत मिळताच मिळालेल्या माहितीनुसार प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी हे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास निघाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे खासगी वाहनातून त्यांनी प्रस्थान केले. दुर्गम भागात शक्यतो कुणी अधिकारी फिरकणार नाही. या आशेने पर्यंतीच्या माळावर वाळूचा ढीग साठवून ठेवला होता. प्रांताधिकाऱ्यांनी या गुप्त ठिकाणावरच छापा टाकला अन् तो वाळूचा ढीग बघतच राहिले. एक दोन नव्हे तर तब्बल १०१ ब्रास चोरीच्या वाळूचा ढीग समोर होता. याचा त्यांनी तत्काळ पंचनामा केला.
या कारवाईत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रभारी नायब तहसीलदार हेमंत दीक्षित, मंडल अधिकारी सानप व तलाठी रसाळ यांनी कारवाई केली. सदर अनधिकृत वाळूसाठ्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत माण तालुक्यात एकाच ठिकाणी चोरीच्या वाळूवर झालेल्या कारवाईपैकी ही सर्वात मोठी कारवाई होती. या कारवाईमुळे विनापरवाना वाळूसाठा करणारे व वाळूचोरांना चांगलीच धडकी भरली आहे.
270721\img-20210727-wa0037.jpg
प्रांताधिकार्याची अवैध वाळूसाठा यावर कारवाई..