सातारच्या शाहूपुरीत भरदिवसा साडेचार लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:32 PM2017-11-20T16:32:40+5:302017-11-20T16:38:53+5:30
सातारा येथील शाहूपुरीमध्ये रविवारी भरदुपारी घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज गेला असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.
सातारा : येथील शाहूपुरीमध्ये रविवारी भरदुपारी घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज गेला असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामिनी राजीव पाटील (वय ४५, रा. सिद्धीविनायक हौसिंग सोसायटी, शाहूपुरी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास पाटील या बाहेर गेल्या होत्या.
त्यावेळी घराच्या पाठीमागील बाजूच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने आत प्रवेश केला. अज्ञाताने घरातून सोन्या, चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
सोन्याच्या दागिन्यामध्ये बारा, आठ आणि एक तोळे वजनाचे गंठण, सव्वा तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याची दोन वेडणी, रिंग, फुलांची जोडी, झुबे तसेच चांदीची १५ नाणी, तीन राशी रत्ने व कॅमेरा नेण्यात आला.
घटनास्थळी श्वानपथक गेले होते. या पथकाने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा चोरीची नोंद झाली.