‘हॉर्न प्लीज’च्या हद्दपारीचा हजारोंचा संकल्प!
By admin | Published: June 3, 2015 10:04 PM2015-06-03T22:04:37+5:302015-06-03T23:40:19+5:30
‘उप प्रादेशिक परिवहन’चा उपक्रम : सायलेंट सिटीकडे साताऱ्याची वाटचाल ; ध्वनी प्रदुषणाला लगाम घालण्यासाठी १३ हजार वाहनधारकांचा पुढाकार
सातारा : एकेकाळी चालकांमध्ये हॉर्न वाजविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची. परंतु अशा हॉर्नमुळे ध्नवीप्रदूषण किती होतेय यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याचे काय, याचे कोणालाही देणेघेणे नसायचे. मात्र, सातारच्या उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकून हॉर्न न वाजविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली असून वाहन चालकांचे प्रबोधन करून त्यांना हॉर्न न वाजविण्यास परावृत्त करणे, त्यांच्याकडून संकल्प करून घेणे अशा प्रकारे या मोहिमेच्या माध्यमातून सातारा सिटी ही सायलंट सिटी करण्याचा निर्धार केला आहे. आत्तापर्यंत तब्बल १३ हजार वाहनचालकांनी या मोहिमेला समर्थन देऊन हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला आहे.पूर्वी नवीन गाडी घेतल्यानंतर चालक आपल्या वाहनाच्या पाठीमागे ‘हॉर्न प्लीज’ चा मजकूर लिहिण्यास विसरायचे नाहीत. आपण गाडी घेतली आहे, हे दाखविण्यासाठी काहीजण मुदमहून कर्कश आवाजाचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण वाटेत अडथळा ठरलेल्या व्यक्तीला अथवा वाहनाला बाजुला करण्यासाठी हॉर्न वाजतात. परंतु असे हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास अनेक घातक परिणाम होतात. हे माहित असूनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.हॉर्न न वाजविणे हे आपल्याच हातात असते. जर प्रत्येकाने ठरवलं आम्ही हॉर्न वाजविणार नाही. तर यावर कारवाई करणे किंवा वाहन चालकांना सक्ती करण्याची गरजच पडणार नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संकल्प करून हॉर्न न वाजविण्याचा निर्णय घेतल्यास ध्वनी प्रदूषण टाळण्यास मदत होईल. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही दूर होतील, या सर्व गोष्टींचा विचार करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. कोणावरही सक्ती न करता वाहन चालकांना हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम व फायदे पटवून दिले जात आहेत.कार्यालयात आलेला चालक हॉर्न न वाजविण्याचा संकल्प करूनच बाहेर पडत आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयात ठेवलेल्या नोंद वहीतही तो चालक आपले नाव आणि या मोहिमेला समर्थन असल्याचे नोंद करत आहे. आत्तापर्यंत तब्बल १३ हजार चालकांनी हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला आहे.मुंबई येथे केवळ एक दिवस हॉर्न वाजवू नका, अशी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु एका दिवसात कोणी अशा सुधारणा करत नसते. त्यामुळे सातारच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक दिवसा ऐवजी कायमस्वरूपीच हॉर्न न वाजविण्याची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
हा उपक्रम बहुदा महाराष्ट्रातील पहिलाच आहे. त्यामुळे उप प्रादेशिक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी ‘हॉर्न प्लीज’च्या हद्दपारीसाठी झटून काम करत आहेत.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हॉर्नचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. नागरिकांनीही या मोहिमेमध्ये स्वत:हून सहभागी व्हावे.
आपल्या आजूबाजुला असणाऱ्या व्यक्तीला हॉर्नमुळे त्रास होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्याहीपेक्षा वाहनांना हॉर्न न बसविणेच सोयीचे ठरेल.
अशा सूचना देऊन वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
स्वत:पासून करा सुरूवात..
हॉर्न न वाजविण्याचा संकल्प प्रत्येकाने स्वत:पासून सुरू केला पाहिजे. त्यानंतरच दुसऱ्यांना हॉर्नचे दुष्परिणाम सांगावेत. हॉर्न विक्रीस ठेवणाऱ्या दुकानदारांनाही हॉर्न विक्रीस न ठेवण्याची विनंती करावी. आपल्या वाहनाला हॉर्न बसवू नयेत. अशा काही सूचना अंमलात आणल्यास सातारा सिटी सायलेट सिटी होण्यास वेळ लागणार नाही. हॉर्नचे दुष्परिणाम काय असतात. हे नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे समजून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या मोहिमेचा प्रसार जास्तीत जास्त करावा, असे आवाहनही उप प्रादेशिक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
ध्वनी प्रदुषणामुळे बहिरेपणा आला तर ऐकण्याची क्षमता पुर्ववत होत नाही. शरीरावर घातक परिणाम होत असतात. प्रत्येकाने हॉर्न न वाजविण्याचा संकल्प करावा आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे.
-संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा
हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम
मानसिक ताण
उच्च रक्तदाब
ह्रदयरोगास आमंत्रण
कायमचा बहिरेपणा
वृद्ध, बालक, रूग्णांमध्ये घबराट
धोकादायक ड्रायव्हिंग
अपघातसदृश्य परिस्थिती
हॉर्न न वाजविण्याचे फायदे
अत्यंत सुरक्षित ड्रायव्हिंग
सुरक्षित रस्ते प्रवास
तणावमुक्त ड्रायव्हिंग
वाहतुकीच्या नियमांचे पालन
नियंत्रित वेग
मानसिक शांतता
पर्यावरणाचे संवर्धन