शाडूच्या शेकडो मूर्तींचे टोपलीत विसर्जन
By admin | Published: September 13, 2016 12:36 AM2016-09-13T00:36:03+5:302016-09-13T00:45:59+5:30
इकोफ्रेंडली गणेशोत्सव : पाचवडच्या महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी साकरलेल्या मूर्तींची घरोघरी स्थापना
पाचवड : पाचवड, ता. वाई येथील रयतच्या महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने तयार केलेल्या शाडूच्या दोनशे मूर्तींचे विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या नव्या संकल्पनेचे ग्रामस्थांनीही भरभरून कौतुक केले.
शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शाळेतील कला शिक्षक प्रदीप कुंभार यांनी एका कार्यशाळेचे आयोजन करून दिले होते. त्यावेळी सुमारे दोनशे शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. पर्यावरणाचे संरक्षण हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावेळी महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथील सर्व शिक्षकांनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला होता. शाडूच्या मूर्ती बनविण्यात पारंगत असलेले शाळेचे कला शिक्षक प्रदीप कुंभार यांनी पुढाकार घेऊन सातारा येथील नामांकित व्यापारी वागडोळे यांच्याकडून शाडूची माती उपलब्ध केली. कार्यशाळेत पाचवी तेआठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून या मातीपासून सुमारे दोनशे शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. या गणेशमूर्तींचे वाटप उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करून या विद्यार्थ्यांच्या घरी याच मूर्तींची प्रतिष्ठापना करून घेतली.
या मूर्तींचे शाळेत पाण्याने भरलेल्या टपात विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी. जी. कणसे, बी. जे. गायकवाड, दत्ताशेठ बांदल, सरपंच महेश गायकवाड, अशोकराव गायकवाड, रमेश पारखे उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
कार्यशाळेमुळे सर्व विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कला तर मिळाली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापनाही झाली. या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरकरीत्या करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंदाच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल परिसरातील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच धार्मिक सण पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे करता येतील याचे ज्वलंत उदाहरणही यामुळे मिळाले.
पाण्याचा झाडांसाठी पुर्नवापर
विसर्जित करण्यात आलेल्या मूर्तींची सुरुवातीला विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये या गणेशमूर्तींना ठेवून त्यांच्यावर पाणी ओतून मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनानंतर साठलेले संपूर्ण पाणी बागेतील झाडांसाठी वापरण्यात आले. तसेच विद्यालयातील इतर वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांनीही आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीनेच करण्याचा संकल्प यावेळी केला.